इंग्लंडचा श्रीलंकेवर विजय (फोटो- ians)
सध्या एकीकडे इंग्लंडचा मुख्य संख्य पाकिस्तानविरुद्ध टेस्ट सिरिज खेळत आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा दुसरा संघ श्रीलंकेविरुद्ध टी 20 सिरिज खेळणार आहे. त्याआधी दोन्ही संघांमध्ये सराव सामना खेळवण्यात आला आहे. पहिल्या सराव सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. मात्र श्रीलंकेने निराशाजनक कामगिरी केली. श्रीलंका 118 रन्सवर ऑल आउट झाली. एकही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही.
११९ रन्सच्या विजयाचे सोपे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड लायन्सच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच तुफानी हल्ला चढवला. अव्वल ३ फलंदाजांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंड लायन्सने अवघ्या ४४ चेंडूंत हे टार्गेट सहज गाठले आणि विजय आपल्या नावावर केला.
या सराव सामन्यातील मानहानीकारक पराभवामुळे मुख्य सिरिज सुरू होण्यापूर्वीच श्रीलंका संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, इंग्लंडकडे असलेल्या खेळाडूंच्या क्षमतेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात कौतुक होत असून, आगामी T20 मालिकेसाठी इंग्लंड लायन्सने प्रतिस्पर्धी संघाला म्हणजेच श्रीलंकेला स्पष्ट इशारा दिला आहे.
सलामीला आलेल्या एनेरिन डोनाल्डने मैदानात पाऊल ठेवताच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने अवघ्या ८ बॉलमध्ये ३१ रन्स कुटल्या. या स्फोटक खेळीत त्याने ३ चौकार आणि सलग ३ तुफानी षटकार ठोकले. डोनाल्ड बाद झाल्यानंतर टॉम बँटन आणि विल जॅक्स यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. टॉम बँटनने २४ बॉलमध्ये ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५६ रन्सची खणखणीत खेळी साकारली. तर दुसऱ्या बाजूने विल जॅक्सने १२ चेंडूंत ३० धावा कुटत नाबाद राहून संघाला सहज विजय मिळवून दिला.






