"You are a true servant of your country..", Former India Test captain's emotional message on Angelo Mathews' retirement; Watch Video
Rohit Sharma’s emotional message for Angelo Mathews : श्रीलंकेचा दिग्गज अँजेलो मॅथ्यूजने गेल्या महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर आपण कसोटीला अलविदा करणार असल्याचे घोषित केले होते. श्रीलंकेमधील गॉल येथे बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्याने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२०२७ सायकलला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा सामना श्रीलंकेचा दिग्गज अँजेलो मॅथ्यूजसाठी खूप महत्त्वाचा आणि भावनिक असणार आहे. कारण, हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे. मॅथ्यूजने २००९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १५ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अष्टपैलू म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अशातच भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधील मॅथ्यूजच्या योगदानाचे कौतुक केले आहे, तसेच श्रीलंकेच्या या स्टार खेळाडूचे अभिनंदन करण्यासाठी त्याने एक भावनिक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
रोहित शर्माने अँजेलो मॅथ्यूजसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात त्याने म्हटले आहे की, “अरे अँजी, तुझ्या अद्भुत कारकिर्दीबद्दल अभिनंदन. अंडर-१९ दिवसांपासून ते आतापर्यंत, आम्ही गेल्या काही वर्षांत अनेक चांगल्या लढाया लढल्या आहेत. तू तुझ्या देशाचा खरा सेवक असून मला खात्री आहे की घरी प्रत्येकजण तुझ्या देशासाठी केलेल्या कामगिरीचा सन्मान करेल.”
अँजेलो मॅथ्यूजने ११८ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४४.६२ च्या सरासरीने ८,१६७ धावा केल्या आहेत. सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंच्या यादीत अँजेलो मॅथ्यूज त्याचा क्रमांक कुमार संगकारा (१२,४००) आणि महेला जयवर्धने (११,८१४) यांच्या नंतर तिसऱ्या जागी लागतो. अँजेलो मॅथ्यूजने आजवर चेंडू आणि बॅटने देशासाठी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्याने कसोटी स्वरूपात ३३ विकेट्स देखील घेतल्या आहेत.
Rohit Sharma’s heartfelt message to Angelo Mathews on his retirement.🤍 pic.twitter.com/1zykzOVVuq
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) June 17, 2025
मॅथ्यूज हा श्रीलंकेचा तिसरा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला आहे, त्याने २०१३ ते २०१७ दरम्यान ३४ सामन्यांपैकी १३ सामने जिंकून दाखवले आहेत. अँजेलो मॅथ्यूजने कसोटीतून निवृत्ती जरी जाहीर केली असली तरी, गरज पडल्यास तो व्हाईट-बॉल फॉरमॅटमध्ये निवडीसाठी उपलब्ध असणार असल्याचे म्हटले आहे. मॅथ्यूजने नोव्हेंबर २०२३ मध्ये श्रीलंकेसाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता तर जून २०२४ मध्ये त्याने शेवटचा टी२० सामना खेळला होता.