
Night Street Race : नवी मुंबईत रंगणार ऐतिहासिक नाईट स्ट्रीट रेस; 5-6 डिसेंबरला इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचा थरार
इंडियन रेसिंग फेस्टिव्हलने (IRF) 2026 च्या संपूर्ण हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले असून, यंदाच्या हंगामाची अंतिम फेरी नवी मुंबईत होणार आहे. पाम बीच रोडजवळील प्रस्तावित नवी मुंबई स्ट्रीट सर्किटवर 5 आणि 6 डिसेंबरला रात्रीची स्ट्रीट रेस (Night Street Race ) आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या रस्त्यांवर प्रथमच हाय-स्पीड मोटरस्पोर्ट्सचा थरार अनुभवता येणार आहे.
नवी मुंबईतील अंतिम फेरीपूर्वी ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट (BIC) येथे इंडियन रेसिंग फेस्टिव्हलच्या दोन फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्या अनुक्रमे 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर आणि 28 ते 29 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पार पडतील.
याच ठिकाणी यापूर्वी फॉर्म्युला-१ इंडियन ग्रँड प्रिक्सचे आयोजन झाले होते. तब्बल 13 वर्षांनंतर या ठिकाणी FIA-स्तरीय रेसिंगचे पुनरागमन होणार आहे.
Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…
नवी मुंबईतील 3.69 किलोमीटरच्या तात्पुरत्या स्ट्रीट सर्किटवर होणारी ही शर्यत चालकांसाठीही मोठे आव्हान असणार आहे. कायमस्वरूपी रेसिंग ट्रॅकच्या तुलनेत स्ट्रीट सर्किट अरुंद आणि अधिक आव्हानात्मक असते. रात्रीच्या प्रकाशझोतात होणाऱ्या या शर्यतीमुळे चाहत्यांना वेगळाच मोटरस्पोर्ट अनुभव मिळणार आहे.
जागतिक स्तरावर सिंगापूर, लास वेगास, मोनॅको आणि बाकू यांसारख्या शहरांमध्ये स्ट्रीट रेसिंगमुळे पर्यटन, हॉटेल व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबईतील रेसिंगमुळे शहराच्या पर्यटन आणि मनोरंजन क्षेत्राला फायदा होण्याची अपेक्षा आहे.
IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?
रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे (RPPL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अखिलेश रेड्डी यांनी या वेळापत्रकाबाबत उत्साह व्यक्त केला. भारतीय मोटरस्पोर्टला नव्या उंचीवर नेण्याच्या दृष्टीने २०२६ चे वेळापत्रक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
बुद्ध इंटरनॅशनल सर्किट आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणी रेसिंग आयोजित करण्याचे स्वप्न दीर्घकाळापासून होते. या दोन्ही ठिकाणांना हंगामाच्या वेळापत्रकात समाविष्ट करताना आनंद होत असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.
तसेच इंडियन रेसिंग फेस्टिव्हलच्या २०२६ हंगामाला कोईम्बतूरमधील कारी मोटर स्पीडवेवर सुरुवात झाली. F4 इंडियन चॅम्पियनशिपच्या पहिल्या दोन फेऱ्या येथे पार पडल्या आहेत.
पहिल्या फेरीत आरिस किरियाकूने दोनदा उपविजेतेपद मिळवले, तर तिसऱ्या शर्यतीत विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत गोवा एसेस जेए रेसिंगच्या लक्सिक्स संबुडलाने दोन विजय मिळवले. हैदराबाद ब्लॅकबर्ड्सच्या भुवन बोगीने उर्वरित एक शर्यत जिंकली.
दोन फेऱ्यांनंतर किरियाकू गुणतालिकेत आघाडीवर आहे. आता F4 इंडियन चॅम्पियनशिपची पुढील फेरी २२-२३ ऑक्टोबरला चेन्नईतील मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर होणार आहे. याच फेरीत इंडियन रेसिंग लीग (IRL) २०२६ हंगामात पदार्पण करणार आहे.
22-23 ऑक्टोबर 2026 – मद्रास इंटरनॅशनल सर्किट, चेन्नई
31 ऑक्टोबर – 1 नोव्हेंबर 2026 – बुद्ध इंटरनॅशनल सर्किट, ग्रेटर नोएडा
28-29 नोव्हेंबर 2026 – बुद्ध इंटरनॅशनल सर्किट, ग्रेटर नोएडा
5-6 डिसेंबर 2026 – नवी मुंबई स्ट्रीट सर्किट
नवी मुंबई आणि बुद्ध इंटरनॅशनल सर्किटच्या समावेशामुळे भारतीय मोटरस्पोर्टचा विस्तार करण्यास तसेच नव्या चाहत्यांना या खेळाशी जोडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. BIC आणि नवी मुंबईतील रेसचे थेट प्रक्षेपण लाइव्हस्टार आणि स्टार स्पोर्ट्सवर करण्यात येणार आहे.