
ICC Rankings: Suryakumar's winning streak was halted in Visakhapatnam! What are the India-New Zealand ICC rankings?
ICC Rankings : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी आयसीसी रँकिंग जाहीर करण्यात आली होती. आता या मालिकेतील चार सामने खेळवण्यात आले आहेत. पहिल्या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला तर काल विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताला ५० धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आयसीसीने जाहीर केलेल्या अपडेटेड रँकिंगमध्ये नेमके काय बदल झाले हे पाहणे महत्त्वाचे ठरते. भारतीय संघ आयसीसी रँकिंगमध्ये आपले पहिले स्थान शाबूत ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.
हेही वाचा : IND vs NZ 4th T20I : अभिषेक शर्माच्या नावे लाजिरवाणा विक्रम! चौथ्या टी-20 सामन्यात केली ‘ही’ कामगिरी
न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर देखील, आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये भारतीय संघाला काही एक नुकसान झालेले नाही. भारतीय संघ रेटिंग २७२ सह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. भारताने पहिले तीन सामने जिंकून आधीच मालिका आपल्या खिशात टाकली होती. त्यामुळे या पराभवाचा त्याच्या रँकिंगवर काही फारसा परिणाम होऊ शकला नाही. सध्या, भारतीय संघ भक्कम स्थितीत आहे, त्यामुळे अव्वल स्थानावरून भारताला खाली खेचणे सोपे असणार नाही.
आयसीसी टी२० क्रमवारीत ऑस्ट्रेलियन संघाने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. त्यांचे सध्याचे रेटिंग २६७ आहे. कांगारू संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून तिथे ते तीन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. या मालिकेच्या निकालांचा ऑस्ट्रेलियाच्या रेटिंगवर निश्चितच परिणाम होण्याची शक्यता आहे.
आयसीसी टी२० क्रमवारीत इंग्लंड सध्या तिसऱ्या स्थानावर विराजमान असून इंग्लंड चे रेटिंग २५८ आहे. इंग्लंडसंघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर तीन सामन्यांची टी२० मालिका खेळत असून मालिकेदरम्यान इंग्लंडच्या रेटिंगमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चौथा टी२० जिंकून देखील न्यूझीलंडच्या स्थानामध्ये सुधारणा झालेली दिसत नाही. किवी संघ २५१ च्या रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका पहिल्या पाचमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
टॉप पाच संघांच्या सध्याच्या क्रमवारीकडे जर पाहिले तर हे स्पष्ट होते की, टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघ अव्वल क्रमांकावर विराजमान राहील. भारताकडे लक्षणीय आघाडी असून सध्या कोणताही संघ त्याच्या स्थानाला आव्हान देऊ शकेल असे वाटत नाही. टी-२० विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू होत असून त्या दिवशी तीन सामने खेळले जाणार आहेत. स्पर्धेदरम्यान क्रमवारीत निःसंशयपणे चढ-उतार दिसण्याची शक्यता आहे.