शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या(फोटो-सोशल मीडिया)
Shivam Dube vs Hardik Pandya in T20s : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा टी२० सामना बुधवारी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध ५० धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताने जरी या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी भारताच्या शिवम दुबेच्या खेळीने मात्र सर्वांची मने जिंकली आहेत. त्याने फक्त १५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे भारतीय खेळाडूंकडून तिसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे.
जलद अर्धशतक झळकवण्याच्या यादीत युवराज सिंग अव्वल स्थानी आहे. ज्याने २००७ च्या डर्बन येथे झालेल्या टी२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध फक्त १२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. चौथ्या सामन्यात शिवम दुबेने २३ चेंडूत ६३ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ७ षटकार ठोकले होते. दुबे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर येत आहे. भारताकडे आता हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे असे दोन अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. जे आहेत जे त्यांच्या बॅट आणि बॉलने कोणत्याही क्षणी सामन्याला वळण देण्याची क्षमता ठेवतात. ५४ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर या दोघांपैकी कोणाची आकडेवारी चांगली आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : IND vs NZ 4th T20I : अभिषेक शर्माच्या नावे लाजिरवाणा विक्रम! चौथ्या टी-20 सामन्यात केली ‘ही’ कामगिरी
शिवम दुबेने आतापर्यंत ५४ टी२० सामन्यांमध्ये ३९ डावांमध्ये फलंदाजी केली आहे, २८.८० च्या सरासरीने ७४९ धावा फटकावल्या आहेत. या काळात दुबेचा स्ट्राइक रेट १४९.२० इतका राहिला आहे. आतापर्यंत ५४ टी२० सामन्यांमध्ये शिवम दुबेने ४९ चौकार आणि ४५ षटकार मारले आहेत. शिवाय, दुबेने ५४ टी२० सामन्यांनंतर ३७ डावांमध्ये गोलंदाजी केली असून यामध्ये २७.२३ च्या सरासरीने २६ विकेट्स चटकावल्या आहेत.
हेही वाचा : IND vs NZ 4th T20I : न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या पराभवाला कारणीभूत कोण? ‘या’ खेळाडूंची नावे आघाडीवर
हार्दिक पंड्याबद्दल बोलायचे झाले तर, ५४ टी२० सामन्यांनंतर, हार्दिकने ३६ डावांमध्ये २०.४८ च्या सरासरीने ५५३ धावा काढल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १४६.२९ होता. हार्दिक पंड्याने त्याच्या पहिल्या ५४ सामन्यांमध्ये एकूण ३४ चौकार आणि ३२ षटकार लगावले आहेत. शिवाय, गोलंदाजीमध्ये हार्दिकने ५४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २७.४ च्या सरासरीने ४२ विकेट्स चटकावल्या आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट ८.२३ इतका राहिला होता.






