
india beat australia by 49 runs
या सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून भारत ‘अ’ संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी भारत ‘अ’ संघाला भक्कम सुरुवात करून दिली. प्रभसिमरनने ३४ चेंडूंमध्ये ३९ धावा केल्या, तर प्रियांशने ४५ चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या. मात्र, यानंतर भारताचा डाव अडखळला आणि ११८ धावांत पाच विकेट्स पडले. देवदत्त पडिक्कल २, रजत पाटीदार ३ आणि निशांत सिंधू ५ धावा करुन स्वस्तात बाद झाले.
कर्णधार ऋतुराज गायकवाडने त्यानंतर ५७ चेंडूंमध्ये ३३ धावा करून डाव सावरला. त्यानंतर सूर्यांश शेडगेने ६० चेंडूंमध्ये ६६ धावांचे शानदार अर्धशतक झळकावून भारताला २०० धावांच्या पुढे नेले. अखेरीस विप्रज निगमने ४४ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. टीम इंडिया ४७.३ षटकांत २७५ धावांवर तंबूत परतली. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वार्शियस आणि विल सदरलँड यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतले.
२७६ धावांचे लक्ष्य गाठताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. जोश फिलिप आणि लियाम स्कॉट यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची सलामीची भागीदारी केली. फिलिप ४८ चेंडूंमध्ये ५६ धावा करून बाद झाला आणि त्यानंतर लगेचच स्कॉट ४२ चेंडूंमध्ये २६ धावा करून बाद झाला. त्यानंतर लॅकलन शॉने ३१, नॅथन मॅकस्वीनीने ३९ आणि निखिल चौधरीने २९ धावा जोडल्या.
पण यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव अडखळला आणि अवघ्या २७ धावांत फलंदाज तंबूत परतले. ऑस्ट्रेलियाचा संघ ४६.२ षटकांत २२६ धावांवर सर्वबाद झाला. भारताने हा सामना ४९ धावांनी जिंकला. भारतासाठी गुरजापनीत सिंगने उत्कृष्ट गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतले. यश ठाकूर आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. विप्रज निगम आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. विप्रज निगमला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन मॅकस्वीनीला मालिकावीर पुरस्कार मिळाला. त्याने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकूण २९९ धावा केल्या आणि दोन विकेट्स घेतले.