IND vs PAK: आशिया कप 2025 स्पर्धेतील (Asia Cup 2025) सर्वात मोठा महामुकाबला रविवार, 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये खेळवला जाईल. हा रोमांचक सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.00 वाजता दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरू होईल. आशिया कपच्या टी-20 फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या संघांनी आतापर्यंत तीन वेळा एकमेकांचा सामना केला आहे. त्यापैकी दोन सामन्यांत भारताने, तर एका सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला आहे. तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या एकूण 13 टी-20 सामन्यांमध्ये भारताने 10 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत. या विक्रमांमुळे सामन्याची उत्कंठा आणखी वाढली आहे.
क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंच्या कामगिरीपेक्षाही दोन्ही देशांतील खेळाडूंमधील वाद अधिक चर्चेत राहिले आहेत. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमधील ६ मोठ्या वादांवर एक नजर टाकूया:
2010 च्या एशिया कपमध्ये पाकिस्तानचा यष्टिरक्षक कामरान अकमलने फलंदाजी करत असलेल्या गौतम गंभीरला उगाचच अपील करून त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. अखेर एमएस धोनीला मध्यस्थी करून हा वाद शांत करावा लागला.
2003 च्या एका सामन्यात शोएब अख्तर विरेंद्र सेहवागला एकामागून एक बाऊन्सर टाकत होता, जेणेकरून तो लवकर बाद होईल. शोएबच्या या कृत्याला कंटाळून सेहवाग त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “हिंमत असेल तर नॉन स्ट्रायकर एंडवरील सचिनला बाऊन्सर टाक.” त्यानंतर सचिनने शोएबच्या बाऊन्सरवर षटकार मारला, तेव्हा सेहवागने ‘बाप बाप होता है और बेटा बेटा होता है’ अशी प्रतिक्रिया दिली होती.
2010 च्या एशिया कपमध्ये भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या 7 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज होती. शोएब अख्तरने हरभजन सिंगला त्रास देणारा चेंडू टाकून त्याला चिथावले. यावरून दोघांमध्ये मैदानावरच जोरदार वाद सुरू झाला. यानंतर, हरभजन सिंगने आमिरच्या चेंडूवर षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला आणि अख्तरला आपल्या आक्रमक शैलीत उत्तर दिले.
2007 मध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर असताना, कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. आफ्रिदीच्या चेंडूवर धाव घेताना गंभीर आणि आफ्रिदीची टक्कर झाली. गंभीरला वाटले की आफ्रिदीने मुद्दाम असे केले, त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला.
2004 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बर्मिंगहॅममध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान राहुल द्रविड शोएब अख्तरशी भिडला होता. द्रविड धाव घेत असताना अख्तर त्याच्या मार्गात उभा राहिला, त्यामुळे द्रविड त्याला धडकला. यावर संतापलेल्या द्रविडने अख्तरला धाव घेण्याच्या मार्गातून बाजूला होण्यास सांगितले. यावर अख्तरलाही राग आला. हा वाद वाढताना पाहून पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम-उल-हक आणि पंचांनी हस्तक्षेप करून दोघांना शांत केले.
2005 मध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर असताना, विशाखापट्टणम येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शाहिद आफ्रिदीने महेंद्रसिंग धोनीला शिवीगाळ केली होती. त्यावेळी धोनीच्या कारकिर्दीतील तो पाचवाच सामना होता. धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १२३ चेंडूत १४८ धावा केल्या होत्या, जे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक होते. धोनीला विचलित करण्याच्या उद्देशाने आफ्रिदीने फेक अपील करून त्याला शिवीगाळ केली. यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता धोनीने पुढच्याच चेंडूवर षटकार मारून आफ्रिदीचे तोंड बंद केले.