Former cricketer strongly supports IND-PAK match! He said, "Keep politics out of this match..
IND VS PAK : आशिया कप २०२५ मध्ये आतापर्यंत तीन सामने खेळवण्यात आले आहेत. या आशिया कपमध्ये नेहमीप्रमाणे आता देखील भारत-पाकिस्तान सामन्याची चर्चा अधिक होताना दिसत आहे. आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. अनेकांनी यावर आपले मत मांडले आहे. काहींच्या मते हा सामना खेळवण्यात येऊ नये तर अनेकांनी या सामन्याला समर्थन दिले आहे. अशातच आता माजी भारतीय क्रिकेटपटू योगराज सिंह यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांच्यामते सामन्याला राजकारणापासून दूर ठेवा.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही भारत आणि पाकिस्तान या दोन देशात तणावाचे वातावरण असून दोघांमध्ये दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता १४ सप्टेंबर रोजी आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहे. या सामन्याबाबत योगराज सिंह म्हणाले की भारत-पाकिस्तान सामना राजकारणापासून दूर ठेवण्यात यावा. यामागील कारण म्हणजे पाकिस्तानच्या संघात आपल्याला हरवण्याची ताकद नाही.
आयएएनएसशी बोलत असताना योगराज सिंह म्हणाले की “भारत-पाकिस्तान सामन्याला सामना म्हणून बघायला हवे, त्याबद्दल कोणतेही राजकारण मध्ये येऊ द्यायला नको. खेळाडूंना राजकारणात खेचले जाऊ नये. यापेक्षा जास्त चर्चा ही तर सामन्यावर करायला हवी.”
योगराज सिंग पुढे म्हणाले की, “युवराज सिंग नेतृत्व करत असणाऱ्या भारतीय संघाने इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळायला नकार दिला होता. याचा काय एक फायदा झाला? जर आपण खेळलो असतो तर आपण नक्कीच जिंकलो असतो. जर आपण त्यावेळी खेळलो नसतो तर आता आपण का खेळत आहोत? जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये सामने झाले पाहिजे. आज पाकिस्तानी संघात तेवढी ताकद नाही की तो भारताला हरवू शकेल.
योगराज म्हणाले की, “भारतीय संघ खूप चांगला आणि मजबूत संघ आहे. मला वाटत नाही की यावेळी कोणताही संघ आपल्यालासमोर टिकू शकेल. आपल्या संघात असे अनेक खेळाडू समाविष्ट आहेत जे आयपीएलमध्ये त्यांच्या संघाचे नेतृत्व करताना आपल्याला दिसतात. आपण देशाच्या अभिमानासाठी मैदानात खेळत आहोत. सध्याच्या भारतीय संघात खेळत असणारे खेळाडू किंवा येणाऱ्या काळातील खेळाडू खूप मोठे खेळाडू असणार आहेत. आयपीएलचे यात मोठे योगदान आहे. जोपर्यंत आयपीएल आहे तोपर्यंत कोणीही भारतीय क्रिकेटला हरवू शकत नाही.
हेही वाचा : Duleep Trophy Final सामन्यात मध्य झोनच्या रजत पाटीदारचा शतकी तडाखा! भारतीय संघात परतण्याची आशा बळावली