एडिलेड : टी-20 वर्ल्डकपमधील (t20 world cup) आज भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात सामना होत आहे. भारताचा टी-20 वर्ल्डकपमधील आजचा चौथा सामना आहे. मागील दोन सामने भारताने जिंकले आहेत, तर तिसऱ्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पाच विकेटसनी पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) सामन्याला सुरुवात झाली असून, बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड संघावर विजय मिळवले आहेत. तर बांग्लादेशनेही दोन विजय मिळवले आहेत. दोन्ही संघांना प्रत्येकी एक सामना गमवावा लागला आहे. ज्यानंतर दोघेही आपला सुपर 12 मधील चौथा सामना आज खेळणार आहेत.
दरम्यान, आज जिंकणारा संघच सेमीफायनलच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकणार असून दुसऱ्या संघाचा प्रवास अत्यंत खडतर होईल. आज विजय मिळवणारा संघ ६ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचणार आहे. झिम्बाब्वे ( ३), पाकिस्तान ( २) व नेदरलँड्स ( २) हे गुणतालिकेत शर्यतीत आहेत, परंतु त्यांची शक्यता फार कमीच आहे. भारतासमोर आज एडिलेड येथे बांगलादेशचे आव्हान आहे आणि आजचा विजय भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा करणारा आहे. ग्रुप २ मध्ये दक्षिण आफ्रिका ५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर भारत व बांगलादेश यांच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा विजयपथावर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. दोन्ही संघासाठी आजचा सामना ‘करो या मरो’ असा आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात पंतला विश्रांती देण्यात आली आहे.
भारत संघ:
रोहित शर्मा(कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
बांग्लादेश संघ:
नजमुल हुसैन शान्तो, शोरीफुल इस्लाम, लिटन दास, शाकिब अल हसन (कर्णधार), अफिफ हुसैन, यासिर अली, मोसादेक हुसैन, नूरुल हसन (विकेटकीपर), मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तस्कीन अहमद.