India Beat Pakistan: आशिया कप सुपर ४ चा सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात दुबईच्या मैदानावर खेळला गेला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने दणदणीत पराभव केला. एशिया कपमधील भारतीय संघाचा हा सलग चौथा विजय ठरला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ५ विकेट्स गमावून १७१ धावा केल्या होत्या.
The openers took charge early, leaving little for the rest, as India finished the chase comfortably#INDvPAK SCORECARD 👉 https://t.co/ZifqaxgMWT pic.twitter.com/u8K0t0QEfr
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 21, 2025
प्रत्युत्तरादाखल भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी धमाकेदार फलंदाजी करत संघाला शानदार सुरुवात करून दिली आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. भारताने १८.५ षटकांत ४ विकेट्स गमावून १७४ धावा करत सामना जिंकला.
या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानला तिसऱ्या षटकात पहिला झटका बसला. फखर जमां ९ चेंडूंमध्ये १५ धावा करून हार्दिक पांड्याचा बळी ठरला. पाकिस्तानसाठी साहिबजादा फरहानने सर्वाधिक ५८ धावा केल्या. भारताकडून शिवम दुबेने सर्वाधिक २, तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १ विकेट घेतली. मात्र, जसप्रीत बुमराहने ४ षटकांत ४५ धावा दिल्या.
१७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शुभमन गिलने २८ चेंडूत ४७ धावांची शानदार खेळी करून तो बाद झाला. त्याला फहीमने बाद केले. यानंतर सूर्यकुमार यादव (०) आणि अभिषेक शर्मा (७४) हे लवकर बाद झाले, पण तोपर्यंत भारताचा विजय निश्चित झाला होता. अभिषेक शर्माने ३९ चेंडूत ७४ धावांची तुफानी खेळी केली. या विजयासह भारताने एशिया कपमधील आपली विजयाची मालिका कायम राखली आहे.