
हरमनप्रीतच्या रनरागिणींनी पाकिस्तानला लोळवले
दुबई : महिला आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते. मात्र, हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियापुढं पाकिस्तानचा नभिवा लागला नाही. पाकिस्ताननं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली. भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव 55 धावांमध्ये गुंडाळला. यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी संयमी खेळी करत विजय मिळवून दिला.
हरमनप्रीत कौरनं नाबाद १८ आणि दीप्ती शर्मानं नाबाद १४ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. भारताने पाकिस्तानला ७ विकेटनं पराभूत केले. शफाली वर्मानं १२ धावा केल्या तर पाकिस्तानच्या फातिमा सना हिने ३ विकेट घेतल्या. महिला आशिया कप स्पर्धेच्या नवव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सामना रोमहर्षक होईल, असा अंदाज होता. मात्र, भारतीय संघानं या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व मिळवलं.
पाकची कर्णधार फातिमा सना हिनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, १८.१ ओव्हरमध्ये पाकचा संघ ५५ धावांवर बाद झाला. भारताकडून श्री चरणी आणि प्रेमा रावतनं ३-३ विकेट घेतल्या. टी २० क्रिकेटमधील पाकिस्तानची सर्वात कमी धावसंख्या सामन्यात नोंदवली गेली.
जुल्फिकारची सर्वाधिक १४ धावांची खेळी
पाकिस्तानसाठी शवाल जुल्फिकार हिनं सर्वाधिक १४ धावांची खेळी केली. यामध्ये तीन चौकारांचा समावेश होता. पाकिस्तानच्या ९ खेळाडूंना दोन अंकी धावसंख्या देखील गाठता आली नाही. पाकिस्तानची पहिली विकेट २७ धावांवर पडली. त्यानंतर त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळला. पाकिस्तानसाठी मुनीबा आणि शवाल यांनी पहिल्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. यानंतर पाकच्या विकेट धडाधड गेल्या.
फातिमा सना, नशरा संधूला उघडता आलं नाही खातं
मुनीबा हिनं १३, आयशा जफरनं २ धावा, सदफ शम्सनं ३ धावा, इमयान फातिमानं ५ धावा, उम्मे हानी हिनं ६ धावा आणि तुबा हसन हिने ९ धावा केल्या. तर, नशरा संधू, सादिया इकबाल, गुल फिरोजा आणि फातिमा सना यांना खातं उघडता आलं नाही.
हरमनप्रीतचा विक्रम
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने शनिवारी पाकिस्तानविरूद्ध एक उल्लेखनीय विक्रम केला आहे. पुरुष आणि महिला क्रिकेट या दोन्हीमध्ये १५० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारी ती आता जगातील पहिली खेळाडू ठरली आहे. हा विक्रम महत्त्वपूर्ण आहे, कारण एम.एस. धोनी, विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांनाही टी-२० मध्ये कर्णधारपदाचा हा टप्पा गाठता आला नव्हता.
IND W vs PAK W : लयं बेकार इज्जत काढली ! वाघिणींनी पाडला फडशा, पाकिस्तान 55 रन्सवर गारद