भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन हा नेहमीच त्याच्या चतुरस्त खेळीमुळे चर्चेत असतो. मात्र आता लक्ष्य सेन त्याच्या वयामुळे वादात अडकला आहे. सेननं आपल्या वयाबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. कर्नाटकात बॅडमिंटन अकादमी चालवणारे नागराज एम.जी. यांनी सेन विरुद्ध ही तक्रार केली असून कर्नाटक पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे
नागराज एम.जी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ‘लक्ष्य सेन याचा जन्म 1998 मध्ये झाला होता, मात्र त्याने चुकीच्या पद्धतीने 2001 ही जन्मतारीख नमूद केली होती. खोटी कागदपत्रे तयार करून आरोपीने इतर खेळाडूंची फसवणूक करून शासनाकडून चुकीच्या पद्धतीने फायदा मिळविल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.’ लक्ष्य आणि त्याचा भाऊ चिराग या दोघांच्या जन्माच्या दाखल्यांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांनी आयपीसी कलम 420, 468, 471 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
बंगळुरूमधील हाय ग्राउंड्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्यचे वडील धीरेंद्र कुमार सेन, त्याची आई निर्मला सेन, भाऊ चिराग सेन आणि प्रशिक्षक विमल कुमार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. धीरेंद्र कुमार सेन हे बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत, तर लक्ष्यचा भाऊ चिराग सेन हा देखील बॅडमिंटनपटू आहे. यंदा झालेल्या बर्मिंगहम येथील कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Gams 2022) स्पर्धेत लक्ष्य सेन याने कमाल कामगिरी करत भारताची पदक संख्या वाढवण्यात मोलाची कामगिरी पार पाडली होती. लक्ष्य सेन याला नुकतंच अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.