
IND vs PAK Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग
भारताला वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. वैभवने 9 चेंडूंत दोन षटकारांसह 15 धावा केल्या. त्यानंतर संजू सॅमसन केवळ 2 धावांवर बाद झाला. मात्र दुसऱ्या बाजूने अभिषेकने पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने अवघ्या 20 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि अखेर 28 चेंडूंत 61 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या डावात 3 चौकार आणि तब्बल 7 षटकारांचा समावेश होता. आजच्या सामन्यातील त्याच्या षटकारांच्या कामगिरीने काही उल्लेखनीय T20 विक्रमांनाही गवसणी घातली.
अभिषेक बाद झाल्यानंतर भारताच्या धावगतीला काही काळ ब्रेक लागला. ईशान किशनने 20, तर कर्णधार श्रेयस अय्यरने 21 धावा केल्या. 14.1 षटकांत भारताची अवस्था 5 बाद 133 अशी झाली होती. मात्र त्यानंतर तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांवर जोरदार प्रतिहल्ला केला.
तिलक वर्माने अवघ्या 22 चेंडूंत 51 धावा फटकावत भारतीय डावाला जबरदस्त फिनिश दिली. शिवम दुबेनेही 15 चेंडूंत 27 धावा केल्या. या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर 212 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा तब्बल 124 धावांनी पराभव केला होता. भारताच्या 169 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ अवघ्या 45 धावांत गारद झाला. दुसरीकडे पाकिस्तानने पावसामुळे 13 षटकांच्या झालेल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशवर सहा विकेट्सने विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला.
आता पाकिस्तानसमोर सुवर्णपदकासाठी 20 षटकांत 212 धावांचे आव्हान आहे. भारत गतविजेता असून सलग दुसरे एशियन गेम्स सुवर्णपदक जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला आहे.