
Chess Championship
खुल्या गटातील भारतीय संघात प्रशिक्षक ग्रँडमास्टर श्रीनाथ नारायणन यांच्या नेतृत्वाखाली अर्जुन इरिगेसी, आर. प्रज्ञानंद, निहाल सरीन, जगज्जेता डी. गुकेश आणि विदित गुजराथी या ग्रँडमास्टरचा समावेश होता. महिला संघाचे नेतृत्व प्रशिक्षक ग्रँडमास्टर स्वयंम्स मिश्रा यांनी केले. संघात कोनेरू हंपी, दिव्या देशमुख आणि आर. वैशाली या ग्रँडमास्टरसह वंतिका अग्रवाल आणि सविता श्री या आंतरराष्ट्रीय मास्टरचा समावेश होता.
वैयक्तिक कामगिरीतही भारतीयांची चमक
वैयक्तिक कामगिरीतही भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळविले. सविता श्रीने पदार्पणाच्या ऑलिम्पियाडमध्ये पाचव्या पटावर अपराजित राहत १० पैकी ९ गुण मिळवत वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. जॉर्जियाविरुद्धच्या अंतिम फेरीत भारतीय महिला संघाने बरोबरी साधल्याने संघाला कांस्यपदक मिळाले. दिव्या देशमुखने दुसऱ्या पटावर रौप्यपदक, तर डी. गुकेशने रौप्यपदक पटकावले. कोनेरू हंपी आणि वंतिका अग्रवाल यांनी कांस्यपदकांची कमाई केली.
अभिजीत कुंटे यांचे पुण्यात स्वागत
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे हे भारतीय संघाचे पथकप्रमुख होते. भारतात परतल्यानंतर पुण्यातील बुद्धिबळप्रेमींच्या वतीने नगरसेवक सुनील पांडे यांनी कुंटे यांचे स्वागत केले. समरकंद ऑलिम्पियाडमध्ये आशियाई संघांचे वर्चस्व राहिले. एकूण सहापैकी पाच सांघिक पदके आशियाई संघांनी पटकावली. खुल्या गटात उझबेकिस्तान, भारत आणि जर्मनी यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले. महिला गटात चीन, कझाकिस्तान आणि भारत यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.
नियोजनबद्ध तयारीचे यश
भारतीय बुद्धिबळपटूंच्या कामगिरीबद्दल बोलताना कुंटे म्हणाले, “हा प्रदीर्घ प्रवास अखेर यशदायी ठरला आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवीन सुधारणा, नियोजनबद्ध पूर्वतयारी आणि सर्वोतोपरी पाठिंबा देणाऱ्या यंत्रणांच्या मदतीने केलेल्या परिश्रमांचे हे फळ आहे. भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच सलग तिसऱ्या ऑलिम्पियाडमध्ये आम्ही गॅपरिंदाश्विली करंडक पटकावू शकलो.”“श्रीनाथ नारायणन आणि स्वयंम्स मिश्रा या आमच्या प्रशिक्षकांनी गेली सहा वर्षे अथक परिश्रम घेतले असून ते संघाचा कणा ठरले आहेत. प्रत्येक खेळाडूने शंभर टक्के योगदान दिल्यामुळे ही कामगिरी शक्य झाली.” असेही कुंटे यांनी नमूद केले.
पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कलकडून कौतुक
पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कलच्या वतीने पुण्याच्या बुद्धिबळ क्षेत्रातील महत्त्वाचे नाव असलेल्या अभिजीत कुंटे यांचे कौतुक करण्यात आले. ऑलिम्पियाडमधील प्रशिक्षक म्हणून कुंटे यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. बुडापेस्ट २०२४ ऑलिम्पियाडमध्ये त्यांनी भारतीय महिला संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले होते. आता समरकंद ऑलिम्पियाडमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने खुल्या गटात रौप्य, महिला गटात कांस्यपदक मिळविताना सलग तिसऱ्यांदा गॅपरिंदाश्विली करंडक पटकावला. “या अभूतपूर्व यशाबद्दल आम्ही संपूर्ण भारतीय बुद्धिबळ संघाचे हार्दिक अभिनंदन करतो. हे यश साजरे करण्याची संधी दिल्याबद्दल भारतीय संघाचे आभार,” असे पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कलच्या पत्रकात म्हटले आहे.