Yashshvi jaiswal : वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत 'त्याला' संधी द्या, इरफान पठाणने केली यशस्वी जयस्वालची पाठराखण, सौजन्य : आयएएनएस
यशस्वी नेहमीच भारतीय संघातील बॅकअप ओपनर म्हणजेच राखीव सलामीवीर म्हणून राहिला आहे. मात्र त्याला मिळालेल्या मर्यादीत संधीचे त्याने सोने केले. डावखुऱ्या या फलंदाजाने आतापर्यंत सहा वनडे सामन्यात दोन खणखणीत शतक ठोकले आहेत. कर्णधार शुभमन गिल व स्टार फलंदाज रोहित शर्मानंतर सलामीच्या रुपात त्याने स्वतःची एक जागा निर्माण केली आहे. भारत २७ सप्टेंबरपासून घरच्या मैदानात वेस्टइंडिजविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. अशात पठाण हे पाहण्यास उत्सुक आहे की, भारतीय संघ व्यवस्थापन डावखुऱ्या फलंदाजाला कशाप्रकारची संधी देतो, जेणेकरून विश्वचषक २०२७ आधी तो आपली लय कायम राखू शकेल.
पठाणने स्टार स्पोर्ट्सद्वारे आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो म्हणतो की, या मालिकेत एका खेळाडूवर माझे लक्ष असेल. तो खेळाडू म्हणजे यशस्वी जयस्वाल. मी हे पाहण्यास उत्सुक आहे की, त्याला किती संधी मिळतात, खासकरून वेस्ट इंडिजविरुद्धच्या या वनडे मालिकेत. पठाण पुढे म्हणतो की, बघा, एक गोष्ट तर निश्चित आहे, ती म्हणजे जयस्वाल हा बॅकअप ओपनर आहे. तो सध्या आपला तिसरा ओपनर आहे. जोपर्यंत आपण साऊथ आफ्रिकेला (वनडे विश्वचषक) पोहचाल, तोपर्यंत असे होऊ नये की, आपल्या बॅकअप ओपनरला योग्य संधी मिळालेली नसेल. त्यामुळे जेव्हा देखील संधी मिळेल, त्याला खेळताना पाहणे माझ्यासाठी गरजेचे आहे.
Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral
आशियाई स्पर्धेत भारताने आपला बळकट संघ पाठवला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत काही नव्या क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. याच नमन धीर (ज्याला पहिल्यांदा भारतीय संघात निवडण्यात आले), आकिब नबी (ज्याला पहिल्यांदा वनडेसाठी निवडण्यात आले) आणि नितीश कुमार रेड्डीचा समावेश आहे. पठाणच्या मते, वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका या खेळाडूंसाठी एक संधी असेल. श्रेयस, अक्षर आणि वॉशिंग्टन सुंदर हे आशियाई स्पर्धेसाठी गेलेत, त्यामुळे ते संघात नाहीत. त्यामुळे इतर खेळाडूंसाठी ही एक मोठी संधी आहे. हा एकप्रकारे वेगळा संघ आहे, ज्यात अनेक खेळाडूंना आजमावले जात आहे. नितीश कुमार रेड्डीला संधी मिळेल, जुरेलला संधी मिळेल. त्याचसोबत आकिब नबीला संधी मिळेल आणि गुरनूर बरारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या करिअरला पुढे नेण्याची ही नामी संधी असेल असेही पठाणला वाटते.






