ISL: 'या' संघाकडून मराठी रंगभूमीला अनोखी मानवंदना, कर्णधाराचीही केली घोषणा
इंडियन सुपर लीग (ISL) चा नवा हंगाम लवकरच फुटबॉल चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, हा नवा हंगाम सुरू होण्याआधी प्रत्येक संघाकडून आपल्या नव्या संघाची घोषणा करण्यात येत आहे. ISL मधील प्रसिद्ध अशा मुंबई सिटी एफसी (Mumbai City FC)ने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुंबई सिटी एफसीने आपल्या संघातील विविध पदांची घोषणा करताना मराठी रंगभूमीला अनोखी मानवंदना दिली आहे.
नव्या हंगामात मुंबई संघाची धुरा आकाश मिश्राकडे सोपवण्यात आली असून मुख्य प्रशिक्षक मनोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली संघ सज्ज आहे. तसेच संघाच्या नेतृत्त्व गटात कार्लोस डेलगाडोकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ब्रँडन फर्नांडिस तिसरा, तर वलपुईया चौथा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
अनुभवी खेळाडूंच्या या नेतृत्त्व गटाकडून संघाला मैदानावर आणि मैदानाबाहेरही योग्य दिशा मिळेस असा विश्वास क्लबने व्यक्त केला आहे. संरक्षणफळीतील म्हणजेच डिफेडर्स म्हणून विश्वासार्ह खेळाडू अशी ओळख असलेल्या आकाश मिश्रावर आता संघाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी असेल.
संघातील खेळाडूंना एकत्र ठेवणे, संघाची मूल्ये जपणे आणि मैदानावर चांगली कामगिरी करण्यासाठी सर्वांना प्रेरित करणे, यावर त्याचा भर असेल.
कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर आकाश मिश्राने आनंद व्यक्त केला. मुंबई सिटी एफसीचे नेतृत्व करणे हा आपल्यासाठी मोठा सन्मान असल्याचे त्याने सांगितले. क्लबने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानताना, संपूर्ण नेतृत्व गट एकत्रितपणे काम करून चाहत्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल, असेही त्याने स्पष्ट केले.
मुख्य प्रशिक्षक मनोलो मार्केझ यांनीही नव्या नेतृत्व गटावर विश्वास व्यक्त केला. आकाश हा समर्पित खेळाडू असून, मुंबई सिटी एफसीचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी त्याला समजते. तो स्वतःच्या कामगिरीतून इतरांसमोर आदर्श निर्माण करेल, असा विश्वास मार्केझ यांनी व्यक्त केला. कार्लोस, ब्रँडन आणि वलपुईया यांच्या अनुभवाचाही संघाला फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले.
मुंबई सिटी एफसीच्या नव्या हंगामातील मोहिमेला ११ ऑक्टोबर रोजी गोव्यातील फातोर्डा स्टेडियमवर चर्चिल ब्रदर्स एफसीविरुद्धच्या सामन्याने सुरुवात होणार आहे. हा सामना सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल.
मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेला #TheIslanders कडून मनापासून मानवंदना 🙏🩵 #MumbaiCity presents its #MGISL13 squad, celebrating the timeless legacy of Marathi theatre. #AamchiCity 🔵 https://t.co/w601zS0m7Y — Mumbai City FC (@MumbaiCityFC) October 9, 2026
दरम्यान, मुंबई सिटी एफसीने सोशल मीडियावरून संघाची घोषणा करताना मराठी रंगभूमीला अनोखी मानवंदना दिली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील महत्त्वाचा भाग असलेल्या मराठी नाट्यपरंपरेचा सन्मान करण्याचा क्लबचा हा उपक्रम आहे. त्यामुळे नव्या हंगामातील संघाच्या घोषणेला क्रीडाप्रेमींसह मराठी संस्कृतीप्रेमींचेही लक्ष वेधून घेणारा सांस्कृतिक आयाम मिळाला आहे.






