junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत, सौजन्य : आयएएनएस
भारताचे माजी ऑफ स्पिनर रमेश पोवार आणि उत्तर प्रदेशचे अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष विन्स्टन जैदी हे राष्ट्रीय ज्यूनियर पुरुष निवड समिती (junior selection committee)मध्ये समाविष्ट होऊ शकतात. २४ ऑगस्टला बीसीसीआयने समितीतील पाच पदे भरण्यासाठी अर्ज मागवले होते. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर होती.
सध्या भारताचा अंडर-१९ पुरुष संघ राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. तर दुसरीकडे नवी ज्यूनियर निवड समिती साकारण्याच्या प्रक्रियेने वेग धरला आहे. ही नवी समिती तामिळनाडूचे माजी क्रिकेटपटू एस. शरथ यांच्या अध्यक्षतेखालील सध्याच्या समितीची जागा घेतील. सध्याच्या समितीत राणादेब बोस (ईस्ट झोन), हरविंदर सिंह सोढी (नॉर्थ झोन), पथिक पटेल (वेस्ट झोन) आणि कृष्ण मोहन (सेंट्रल झोन) यांचा समावेश आहे. दुसरीकडे, पोवार हे दोन वेळा भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या रुपात कार्यरत होते. त्यांचा दुसरा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना बंगळुरूमध्ये नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये स्पिन-बॉलिंग प्रशिक्षकाच्या रुपात निवडण्यात आले होते. त्यांचा बीसीसीआयसोबतचा अनुभव चांगला राहिलेला आहे.
शनिवारी सुत्रांनी आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, पोवार व जैदी यांनी समितीचा भाग होण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. जर सर्व काही ठिक राहिले तर पोवार हे नवे मुख्य ज्यूनियर निवडकर्ता आणि वेस्ट झोनचे प्रतिनिधी बनू शकतात, तर जैदी सेंट्रल झोनचे ज्यूनियर निवडकर्ते बनतील.
दरम्यान, लवकरच नव्या ज्यूनियर निवड समितीची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही समिती कोचिंग कॅम्पसाठी अंडर-२२ पर्यंतच्या खेळाडूंची निवड करेल, तसेच स्थानिक व परदेशी संघांविरुद्ध भारताच्या ज्यूनियर सामन्यांसाठी (सर्व फॉर्मेटमध्ये देश व परदेशात) संघ निवडीची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागेल.






