
Kabaddi Tournament : मुंबई पोलीस संघाचा दणका, व्यावसायिक गटात दणदणीत विजय
शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित शिवनेरी कबड्डी महोत्सवात (Kabaddi Tournament) रुपाली ज्वेलर्स आणि मुंबई पोलिसांनी व्यावसायिक गटात दणदणीत विजय मिळवला. रुपाली ज्वेलर्सने पहिल्याच फेरीत रिजनल बोर्डाचा खेळ खल्लास केला. महिला गटात मुंबई पोलीस महिला संघ आणि विवेक महिला संघाने, तर कुमार गटात अंकुर क्रीडा मंडळ व यश क्रीडा मंडळाने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
महिला गटात मुंबई पोलीस महिला संघाने चंद्रोदय क्रीडा मंडळाचा 42-13 असा 29 गुणांनी पराभव केला. मुंबई पोलिसांकडून चढाईत तृप्ती लांडगे, तर पकडीत साक्षी भोईर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. चंद्रोदयकडून तीर्था कोलगे हिने चांगला खेळ केला.
दुसऱ्या सामन्यात विवेक महिला संघाने शताब्दी स्पोर्ट्स क्लबचा 50-17 असा 33 गुणांनी धुव्वा उडवला. विवेककडून चढाईत संजना पोळ, तर पकडीत हरजीत कौर यांनी प्रभावी खेळ केला. शताब्दीकडून नंदिनी मौया आणि अनघा गायकवाड यांनी प्रतिकार केला.
IND Vs WI: कर्णधार Shai ने गुंडाळल्या भारताच्या ‘होप’? विजयासाठी ‘इतक्या’ रन्सचे असणार आव्हान
कुमार गटात यश क्रीडा मंडळाने पंचगंगा सेवा मंडळावर 35-31 अशी चार गुणांनी मात केली. यशकडून चढाईत नवनाथ चौघुले आणि पकडीत विवेक पवार यांनी चमक दाखवली. पंचगंगाकडून सोमनाथ यादव व सक्षम सूर्यवंशी यांनी चांगला खेळ केला.
दुसऱ्या सामन्यात अंकुर क्रीडा मंडळाने बंड्या मारुती सेवा मंडळाचा 52-25 असा 27 गुणांनी पराभव केला.
व्यावसायिक गटात बीएमसी संघाने न्यू इंडिया इन्शुरन्स संघाला 35-25 असे पराभूत करत दहा गुणांनी विजय मिळवला. बीएमसीकडून चढाईत हर्ष जाधव, तर पकडीत कृष्णा पवार यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. न्यू इंडिया इन्शुरन्सकडून चढाईत जयेश यादव आणि पकडीत यश बागल यांनी प्रयत्न केले.
दरम्यान, शिवनेरी कबड्डी महोत्सवात कुमार गटातील दुसऱ्या फेरीचे सामने सुरू झाले असून, महिला आणि व्यावसायिक गटातील पहिल्या फेरीचे सामने रंगत आहेत.