
IPL बाबत ललित मोदीचं वक्तव्य ऐकतलं का? थेट बाजारंच उठवला
इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही संकल्पना जगाला देणारी व्यक्ती म्हणजे ललित मोदी. मात्र काही गुंतलेल्या हिंतसंबंधामुळे मोदीला भारत सोडावे लागले. देश सोडला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदीने वेळोवेळी आयपीएलबाबत अनेक वक्तव्य केले आहे. मग ते आयपीएलच्या संघांबाबत असो वा इतर गोष्टींबाबत. सध्या त्याने केलेले एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरत असून यात थेट आयपीएलच्या वेळापत्रकावर त्याने बोट ठेवले आहे.
ललित मोदीने ही मागणी याअगोदरही केली होती. त्याने पुन्हा एकदा आयोजनाच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली आहे. सध्या मार्च-एप्रिलमध्ये होणारी ही स्पर्धा जानेवारी किंवा ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याचा विचार करावा, अशी सूचना त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) केली आहे. आयपीएल ही आता जागतिक क्रिकेटमधील मोठी व्यावसायिक ताकद बनली असून, तिने स्वतःसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्याची क्षमता निर्माण केली आहे, असे मोदीने म्हटले आहे.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मोदीने आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वेळापत्रकाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. आयपीएलसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) स्वतंत्र वेळ मिळवण्याची गरज नाही. ही बीसीसीआयच्या मालकीची आणि संचालनाखालील देशांतर्गत स्पर्धा आहे. त्यामुळे तिचे आयोजन कधी करायचे, हे ठरवण्याचा अधिकार बीसीसीआयला आहे, असे त्याने स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बांधिलकी आणि खेळाडूंची उपलब्धता यांचे नियोजन करणे आवश्यक असले, तरी त्याचा अर्थ आयपीएलने ठरावीक जागतिक वेळापत्रकानुसारच चालले पाहिजे, असा होत नाही, असेही मोदीने नमूद केले.
आयपीएल आता जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात नाही, तर तिने ते स्थान आधीच मिळवले आहे. भारतीय क्रिकेट आणि परदेशी खेळाडूंसाठी ही मोठी व्यावसायिक संधी बनली आहे. 2008 मध्ये आयपीएल सुरू झाली, तेव्हा अनेकांना ही स्पर्धा यशस्वी होईल की नाही, याबाबत शंका होती. मात्र, मनोरंजन क्षेत्रालाही आयपीएलच्या लोकप्रियतेशी जुळवून घ्यावे लागले, असे मोदीने सांगितले.
आयपीएलमुळे चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले, प्राइम टाइम दूरचित्रवाणी कार्यक्रमांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले. आयपीएलने मनोरंजन क्षेत्राकडे वेळ मागितला नव्हता, तर मनोरंजन क्षेत्राने आयपीएलशी जुळवून घेतले, असे उदाहरणही त्यांनी दिले.
मोदीने आयपीएलची तुलना इंग्लिश प्रीमियर लीगशी (ईपीएल) केली. फुटबॉलमध्ये ईपीएलचे जे महत्त्व आहे, तेच महत्त्व क्रिकेटमध्ये आयपीएलने मिळवले आहे. जागतिक स्तरावरील खेळाडू, प्रेक्षक, प्रायोजक आणि प्रसारण हक्क यांमुळे आयपीएल एक मोठी व्यावसायिक व्यवस्था बनली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या वार्षिक क्रिकेट उत्पन्नातील मोठा वाटा आयपीएलमधून मिळणाऱ्या करारांवर अवलंबून असतो, असेही त्यांनी म्हटले.
Badminton: जगात भारी पुणे! ‘या’ बॅडमिंटन स्पर्धेत सयाजी अन् सोयरा शेलारने जिंकला दुहेरी मुकुट
जगभरातील प्रमुख टी-20 लीगमधील संघांसाठी चॅम्पियन्स लीग टी-20 पुन्हा सुरू करण्याच्या चर्चांवरही मोदीने भूमिका स्पष्ट केली. या स्पर्धेची मूळ संकल्पना तयार करण्यात आपला सहभाग होता. मात्र, सध्याची क्रिकेटची परिस्थिती बदलली आहे. आयपीएलमधील फ्रँचायझी मालकांचे गट अनेक आंतरराष्ट्रीय टी-20 लीगमध्ये गुंतलेले आहेत. अशा परिस्थितीत समान मालकी असलेल्या संघांमध्ये सामने झाल्यास हितसंबंधांच्या संघर्षाचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, असे ही त्याने स्पष्ट केले.
आयपीएलचे आयोजन एप्रिल-मे महिन्यांतील वाढत्या उन्हाळ्यापासून दूर नेण्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. जानेवारी किंवा ऑक्टोबरमध्ये स्पर्धा सुरू करता येऊ शकते. यामुळे खेळाडूंना खेळण्यासाठी चांगले वातावरण मिळेल. तसेच प्रसारण हक्क, जाहिराती आणि व्यावसायिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनेही नव्या संधी निर्माण होतील, असे मोदीने सुचवले.
बीसीसीआयकडे मोठा प्रेक्षकवर्ग आणि व्यावसायिक ताकद आहे. त्याचा योग्य वापर करण्यासाठी मंडळाने आत्मविश्वासाने निर्णय घ्यावेत. आयपीएलने कायम जुन्या जागतिक क्रिकेट वेळापत्रकानुसारच चालावे, अशी अपेक्षा करणे योग्य नाही. ‘आयपीएल बाजाराच्या मागे चालण्यासाठी नव्हे, तर बाजार बदलण्यासाठी तयार करण्यात आली होती,’ असे ठाम मत ललित मोदीने यावेळी व्यक्त केले.
Ans: आयपीएलचे आयोजन मार्च-एप्रिलऐवजी जानेवारी किंवा ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याचा विचार करावा, असे त्यांनी सुचवले आहे.
Ans: आयपीएल ही बीसीसीआयच्या मालकीची आणि संचालनाखालील देशांतर्गत स्पर्धा असल्याने तिचे वेळापत्रक ठरवण्याचा अधिकार बीसीसीआयला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
Ans: खेळाडूंना खेळण्यासाठी चांगले वातावरण, प्रसारण आणि जाहिरातींसाठी अधिक व्यावसायिक संधी तसेच भारतीय क्रिकेटला दीर्घकालीन आर्थिक फायदा होऊ शकतो.