लोयला फुटबॉल कप (फोटो - सोशल मिडिया)
लोयला स्कूल आणि एक्स-लोयला अल्युमनी नेटवर्क यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेला टाटा ऑटोकॉमचे प्रायोजकत्व लाभले आहे. बिशप्स कॅम्पने सामन्याची आक्रमक सुरुवात केली. चौथ्या मिनिटाला व्हिरेन बिलिमोरियाच्या स्वयंगोलमुळे बिशप्स कॅम्पने आघाडी घेतली. त्यानंतर कियान सूर्यवंशीने १५व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी २-० अशी केली.
मात्र, सेंट व्हिन्सेंट्सने जोरदार पुनरागमन केले. रियांश मुंडाडाने २४व्या मिनिटाला गोल करत पिछाडी कमी केली, तर व्हिरेन बिलिमोरियाने ३९व्या मिनिटाला गोल करून सामना २-२ असा बरोबरीत आणला. सामना बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआऊटचा आधार घ्यावा लागला. बिशप्स कॅम्पने ३-१ असा विजय मिळवताना कियान सूर्यवंशी, रणवीर झेंडे आणि प्रणय मेनन यांनी पेनल्टीचे गोल केले. गोलरक्षक आर्हतवा डोंगरेने तीन पेनल्टी अडवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
यू-१२च्या आणखी एका उपांत्यपूर्व सामन्यात बिशप्स को-एड स्कूल, उंड्रीने विद्या भवन हायस्कूलला निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरीत रोखल्यानंतर शूटआऊटमध्ये ४-२ असा विजय मिळवला. बिशप्स को-एडसाठी अर्णव जाधव, हर्ष कुंभार, जयांश रेड्डी आणि मितांश शिंदे यांनी पेनल्टीचे गोल केले. विद्या भवनकडून मोझेस गावरे आणि श्लोक कदम यांनी गोल केले.
दरम्यान, विद्या व्हॅली स्कूलने यू-१२ उपांत्यपूर्व फेरीत इन्फंट जीझस स्कूलचा ५-० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. एकांश ओझाने २२व्या आणि २५व्या मिनिटाला दोन गोल केले. त्यानंतर आदित्य द्विवेदी (३५वे), चिराग बिरजे (३७वे) आणि रियांश प्रशर (३९वे) यांनी गोल करत विद्या व्हॅलीचा मोठा विजय निश्चित केला.
विद्या व्हॅलीने यू-१४मध्येही आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी इन्फंट जीझस स्कूलचा ६-० असा एकतर्फी पराभव केला. अंश परिहारने ७व्या आणि २५व्या मिनिटाला दोन गोल केले, तर अर्जुन भाटिया (१८वे), आरव यादवाड (२६वे), आदिराज फाळके (२८वे) आणि युवान लोहिया (३५वे) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
यू-१२ : द बिशप्स स्कूल, कॅम्प २ [३] (व्हिरेन बिलिमोरिया ४’ स्वयंगोल, कियान सूर्यवंशी १५’; कियान सूर्यवंशी, रणवीर झेंडे, प्रणय मेनन) वि सेंट व्हिन्सेंट्स एचएस २ [१] (रियांश मुंडाडा २४’, व्हिरेन बिलिमोरिया ३९’; व्हिरेन बिलिमोरिया). यू-१२ : बिशप्स को-एड स्कूल, उंड्री ० [४] (अर्णव जाधव, हर्ष कुंभार, जयांश रेड्डी, मितांश शिंदे वि विद्या भवन एचएस ० [२] (मोझेस गावरे, श्लोक कदम). यू-१२ : विद्या व्हॅली स्कूल ५ (एकांश ओझा २२’, २५’; आदित्य द्विवेदी ३५’; चिराग बिरजे ३७’; रियांश प्रशर ३९’) वि. इन्फंट जीझस स्कूल ०. यू-१४ : विद्या व्हॅली ६ (अंश परिहार ७’, २५’; अर्जुन भाटिया १८’; आरव यादवाड २६’; आदिराज फाळके २८’; युवान लोहिया ३५’) वि. इन्फंट जीझस ०.






