
Mahela Jayawardene
मुंबई इंडियन्सने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरील एका पोस्टद्वारे महेला जयवर्धने फ्रँचायझी सोडत असल्याची घोषणा केली. संघाची साथ सोडल्यानंतर महेला जयवर्धने भावूक झाला होता. त्याने संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांचे आभार मानले.
तो म्हणाला की, ‘मुंबई इंडियन्स हा गेल्या दशकाहून अधिक काळापासून माझ्या प्रवासाचा एक अत्यंत खास भाग राहिला आहे. येथील खेळाडू, कोचिंग स्टाफ, ‘वन फॅमिली’ आणि चाहत्यांनी माझ्यासाठी हा अनुभव कायम स्मरणात राहील असा खास बनवला आहे. या प्रवासात आम्ही एकत्र अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवले, आव्हानांना धैर्याने सामोरे गेलो आणि सर्वांना अभिमान वाटेल असे यश मिळवले.
तो पुढे म्हणाला की, ‘गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल, सातत्याने पाठिंबा दिल्याबद्दल आणि मैत्री जपल्याबद्दल मी नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांचे मनापासून आभार मानतो. आम्ही एकत्र मिळून जे काही साध्य केले, त्याचा मला खूप अभिमान आहे. मुंबई इंडियन्ससाठी माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान राहील. आगामी वर्षांमध्ये या संघाला भरभरुन यश मिळो, हीच माझी मनापासून शुभेच्छा. ‘
“Mumbai Indians has been a very special part of my journey for over a decade now. The players, coaching team, the incredible support of the #OneFamily and above all the fans have made this an experience I will always treasure. Together, we have shared some unforgettable… pic.twitter.com/qb6p32n8Qh — Mumbai Indians (@mipaltan) October 17, 2026
महेला एक दशकाहून अधिक काळ एमआयसोबत होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने उत्कृष्ट कामगिरी केली होती. महेलाच्या जाण्यावर प्रतिक्रिया देताना नीता अंबानी यांनीही खास संदेश दिला आहे. ते म्हणाले की, ‘महेला यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्ससाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि क्रिकेटवरील प्रेम आमच्यासाठी खूप कास राहिले आहे. मी संपूर्ण मुंबई इंडियन्स परिवाराच्या वतीने, महेला यांचे गेल्या अनेक वर्षांपासून दिलेल्या योगदानाबद्दल आणि संघाप्रती असलेल्या वचनबद्धतेबद्दल आभार मानते.आम्ही हा एकत्र केलेला प्रवास आणि अविस्मरणीय क्षण आमच्यासाठी नेहमीच खास राहतील. महेला हे कायमच आमच्या वन फॅमिलीचा एक भाग असतील. भविष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.’
महेला जयवर्धनेने आयपीएल २०१७ मध्ये मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी आपल्या कार्यकाळाला सुरुवात केली. त्याने रिकी पाँटिंगची जागा घेतली. २०२२ मध्ये, त्याने मुंबई इंडियन्सचे ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स हे पद स्वीकारले. २०२५ मध्ये तो मुख्य प्रशिक्षक म्हणून संघात परतला. जयवर्धनेचा आयपीएल २०२६ हा मुंबई इंडियन्ससोबतचा शेवटचा हंगाम आहे.जयवर्धनेच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल २०१७, आयपीएल २०१९ आणि आयपीएल २०२०चे विजेतेपद जिंकले.