
Mhaswad School won District Level Tennikoit Tournamen
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन दोशी (चेअरमन, अहिंसा नागरी सहकारी पतसंस्था, म्हसवड), हिरालाल काटकर (क्रीडा शिक्षक, गोंदवले), चंद्रकांत तोरणे (क्रीडा शिक्षक), डॉ. वसंत मासाळ (संस्थापक, माणगंगा शैक्षणिक संकुल), सुखदेव मासाळ (उपाध्यक्ष), सौ. सविता वसंत मासाळ (नगरसेविका), डॉ. सतीश मासाळ (नगरसेवक), नाना मासाळ, दगडू मासाळ, तानाजी मासाळ यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे नितीन दोशी यांनी विद्यार्थिनींना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. केवळ खेळामध्ये यश मिळवणे महत्त्वाचे नसून जीवनात संघर्ष म्हणजे काय, परिस्थितीशी झगडत यशाच्या दिशेने वाटचाल कशी करायची, याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थिनींना पटवून दिले. यासाठी त्यांनी विद्यार्थिनींना आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचे पुस्तक भेट देऊन वाचनाची प्रेरणा दिली. पुस्तकांचे वाचन केल्याने विचार समृद्ध होतात, संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते आणि प्रतिकूल परिस्थितीतही ध्येयापर्यंत पोहोचण्याची जिद्द निर्माण होते, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
क्रीडा शिक्षक हिरालाल काटकर यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करताना, सध्या मिळालेले यश ही केवळ सुरुवात असून आता आपले ध्येय राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाठण्याचे असले पाहिजे, असे सांगितले. त्यासाठी विद्यार्थिनींनी पूर्ण ताकदीने, जिद्दीने आणि सातत्याने सराव केला पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थीही आपल्या मेहनतीच्या जोरावर निश्चितच मोठे यश संपादन करू शकतात, याबाबत कोणतीही शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत तोरणे यांनीही आपल्या मनोगतात विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांना खेळातील सातत्य, मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व समजावून सांगितले. आगामी स्पर्धांमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले. संस्थेचे संस्थापक डॉ. वसंत मासाळ यांनी माणगंगा शैक्षणिक संकुलाच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील वाटचालीविषयी मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थिनींनी घेतलेले परिश्रम, प्रशिक्षक व मार्गदर्शक शिक्षकांनी केलेले प्रयत्न आणि त्यातून मिळालेले जिल्हास्तरीय यश याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य संधी, मार्गदर्शन आणि सुविधा दिल्यास तेही राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात, असा विश्वास व्यक्त करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभामुळे विजयी विद्यार्थिनींचा उत्साह द्विगुणित झाला असून आगामी विभागीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागातून जिल्हास्तरावर आणि जिल्हास्तरावरून विभागीय व राष्ट्रीय स्तराकडे झेप घेणाऱ्या माणगंगा स्कूलच्या या कन्यांचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. सर्व विजयी खेळाडू, मार्गदर्शक शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक व संस्थेतील सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.