MI vs CSK: Rohit Sharma breaks Virat Kohli's record in IPL, becoming the only Indian player to do so.
IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात आतापर्यंत ३८ सामने खेळून झाले आहेत. गुणतालिकेत मोठे फेरबदल झालेले बघायला मिळत आहेत. अशातच काल वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात मुंबईने घरच्या मैदानावर चेन्नईला ९ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात रोहित शर्माने ४५ चेंडूचा सामना करत ७६ धावांची तडाखेबंद खेळी. यामध्ये त्याने ४ चौकार आणि ६ षटकार मारले. त्या सोबतच सूर्यकुमार यादवने देखील ३० चेंडूत ६८ धावांची वेगवान खेळी केली. दरम्यान रोहित शर्माच्या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह रोहितने आयपीएलच्या इतिहासात एक अनोखा पराक्रम केला आहे. रोहित शर्माने आयपीएलच्या इतिहासात हा २० वा सामनावीर पुरस्कार जिंकला असून तो सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. ही कामगिरी करत असताना त्याने विराट कोहलीला देखील मागे टाकले आहे.
हेही वाचू : PCB : अरे काय ही पीसीबीची गरीबी..! पाकिस्तानचा माजी मुख्य प्रशिक्षक गिलेस्पी अजूनही पाहतोय मानधनाची वाट..
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावे नोंदवला गेला आहे. त्याने २५ वेळा सामनावीराचा पुरस्कारावर नाव कोरले आहे. त्यानंतर क्रिस गेलचा नंबर लागतो. ज्याने हा पराक्रम २२ वेळा करून दाखवला आहे. रोहित शर्माने २० वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. त्याच्याशिवाय, विराट कोहलीने १९ वेळा, तर डेव्हिड वॉर्नर आणि एमएस धोनी प्रत्येकी १८ वेळा हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नाबाद ७६ धावांची खेळी करत शिखर धवनचा खास विक्रम देखील मोडीत काढला आहे. शिखर धवनने आयपीएलमध्ये आतापर्यंत ६७६९ धावा कुटल्या आहेत. रोहितने ७६ धावांच्या खेळीसह आता ६७८६ धावा करत तो आयपीएलमध्ये दुसऱ्या नंबरचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
हेही वाचू : Doping Case : सात खेळाडूंसह एकूण तीन प्रशिक्षकांवर निलंबनाची कारवाई, अॅथलेटिक्स प्रशिक्षक रमेश निलंबित…
सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ८३२६ धावा केल्या आहेत. यानंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन उपस्थित आहेत. डेव्हिड वॉर्नर चौथ्या क्रमांकावर आहे. ज्याने या स्पर्धेत ६५६५ धावा केल्या आहेत. सुरेश रैना ५५२८ धावांसह पाचव्या स्थानावर आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा वगळता, सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत किंवा आता आयपीएल खेळत नाहीत.