पाकिस्तानच्या प्रशिक्षकाच्या बड्या बड्या बाता
पाकिस्तान आपला आशिया कप 2025 चा प्रवास आज, 12 सप्टेंबर रोजी ओमानविरुद्धच्या सामन्याने सुरू करणार आहे. हा सामना दुबईमध्ये रात्री 8 वाजता (भारतीय वेळेनुसार) होणार आहे. याच सामन्यापूर्वी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी एक मोठे विधान केले आहे, ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले गेले आहे.
ओमानविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत, हेसन यांना विचारण्यात आले की भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये मनगटाच्या फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची असेल का? या प्रश्नावर हेसन म्हणाले, “जेव्हा तुमच्याकडे मनगटाचे असे फिरकी गोलंदाज असतात, तेव्हा खेळपट्टी फारशी महत्त्वाची नसते. मला वाटते की आमच्या संघाचे सौंदर्य म्हणजे आमच्याकडे पाच फिरकी गोलंदाज आहेत.
“Mohammad Nawaz is the BEST SPINNER IN THE WORLD” : Pakistan Head Coach Mike Hesson
“The beauty of our side is we have got five spinners. We have Mohammad Nawaz, who is the best spin bowler in the world at the moment, he is been ranked that way over the last six months since his… pic.twitter.com/nyIH50vh4X
— Cricket.com (@weRcricket) September 11, 2025
आमच्याकडे मोहम्मद नवाज आहे जो सध्या जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. गेल्या सहा महिन्यांपासून, तो संघात परतल्यापासून, त्याचे रँकिंग या पातळीवर कायम आहे.” हेसन यांचे हे वक्तव्य आश्चर्यकारक होते कारण नवाजने अलीकडेच शारजाहमध्ये झालेल्या ट्राय सिरीजच्या अंतिम सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या होत्या.
माजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांचा हा दावा आयसीसीच्या ताज्या टी-20 रँकिंगनुसार पूर्णपणे चुकीचा आहे. आयसीसीच्या क्रमवारीत मोहम्मद नवाज टॉप 15मध्येही नाही, तर त्याची सध्याची रँकिंग 30 आहे. हेसन यांनी सैम अयूबला जगातील टॉप 10 अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हटले होते, परंतु हा दावाही निराधार आहे.
हेसन पुढे म्हणाले, “आमच्याकडे अबरार आणि सुफियान आहेत. तसेच सलमान अली आगा हा देखील पाकिस्तानचा चांगला कसोटी फिरकी गोलंदाज आहे. आम्हाला वाटते की जर परिस्थिती अनुकूल असेल तर आमच्याकडे फिरकी गोलंदाजीसाठी अनेक पर्याय आहेत. जर आम्हाला तसे वाटत नसेल, तर आमच्याकडे पाच वेगवान गोलंदाज देखील आहेत. हे आम्हाला कोणत्या प्रकारची खेळपट्टी मिळते यावर अवलंबून आहे.”