एम.एस. धोनीने (MS Dhoni)२०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आपल्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट केला. मात्र, तो आयपीएलमध्ये अजूनही खेळत राहिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही धोनीकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. पण त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) पेन्शनसुद्धा मिळते.
बीसीसीआयच्या पेन्शन योजनेअंतर्गत, माजी क्रिकेटपटूंना मासिक पेन्शन मिळते. २०२२ मध्ये, मंडळाने आपल्या पेन्शन योजनेत सुधारणा करून माजी खेळाडूंना दिली जाणारी रक्कम वाढवली. धोनी भारतासाठी ९० कसोटी सामने खेळला आहे. याचा अर्थ, २५ किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळलेल्या माजी भारतीय क्रिकेटपटूंमध्ये त्याचा समावेश होतो. सध्याच्या पेन्शन प्रणालीनुसार या श्रेणीतील खेळाडूंना दरमहा ७०,००० रुपये दिले जातात. त्यानुसार, धोनी देखील बीसीसीआयच्या पेन्शन योजनेसाठी पात्र आहे. परंतु, धोनीच्या एकूण कमाईच्या तुलनेत ही रक्कम कमी आहे, कारण त्याच्या उत्पन्नाचे स्रोत आयपीएल, जाहिरात, व्यवसाय आणि ब्रँड एंडोर्समेंट आहेत. २०२५ च्या आयपीएल हंगामासाठी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने त्याला ४ कोटी रुपयांना विकत घेतले.
बीसीसीआयच्या निवृत्तीवेतन योजनेत खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रथम-श्रेणी कारकिर्दीचा विचार केला जातो. २५ किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळलेल्या माजी पुरुष क्रिकेटपटूंना दरमहा ७०,००० रुपये मिळतात, तर २५ पेक्षा कमी कसोटी सामने खेळलेल्या पात्र खेळाडूंना दरमहा ६०,००० रुपये मिळतात. प्रथम-श्रेणी क्रिकेटपटूंचे निवृत्तीवेतन खेळलेल्या सामन्यांच्या संख्येच्या आधारावरही ठरवले जाते. माजी महिला क्रिकेटपटूंनाही त्यांच्या पात्रतेनुसार निवृत्तीवेतनाचे लाभ मिळतात.
एम.एस. धोनीने २००४ मध्ये भारतासाठी पदार्पण केले. तो जवळपास १६ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. या काळात त्याने भारतीय संघाला २००७ टी-२० विश्वचषक, २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवून दिला. धोनीने भारतासाठी एकूण ५३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळून १७,२६६ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १६ आंतरराष्ट्रीय शतके आणि १०८ अर्धशतके आहेत. यष्टीरक्षक म्हणूनही धोनीची कामगिरी प्रभावी असून, त्याने १९५ आंतरराष्ट्रीय यष्टीचीत केले आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली चाहते अजूनही त्याला मैदानावर पाहण्यास उत्सुक आहेत.
U20 अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा डंका! बसंत कुमारला हाय जंपमध्ये रौप्यपदक, शाहनवाजला कांस्य






