पाकिस्तानची नामिबियाला 102 धावांनी पराभूत करत सुपर 8 मध्ये एंट्री(फोटो-सोशल मीडिया)
PAK vs NAM, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ च्या ३५ व्या सामन्यात पाकिस्तानने नामिबियाला १०२ धावांनी पराभूत करत सुपर ८ मध्ये स्थान निश्चित केले आहे. यासह, सुपर ८ मध्ये पोहोचणाऱ्या सर्व संघांच्या नावांची यादी आता निश्चित झाली आहे. पाकिस्तानसाठी करो या मरो असलेल्या या सामन्यात, पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ३ गडी गमावून १९९ धावा उभ्या केल्या. साहिबजादा फरहानच्या नाबाद शतकाने पाकिस्तानचा विजय सोपं केला.
प्रथम फलंदाजी करताना साहिबजादा फरहान आणि सैम अयुब हे दोन सलामीवीर पाकिस्तानला जलद सुरुवात करून देण्यात यशस्वी ठरले. दोन्ही खेळाडूंनी ५.१ षटकांत पहिल्या विकेटसाठी ४० धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. सईम १२ चेंडूत दोन चौकारांसह १४ धावा काढून माघारी गेला. त्यानंतर सलमान आगा आणि साहिबजादा फरहान यांनी ४२ चेंडूत दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचून संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. त्यानंतर सलमान २३ चेंडूत दोन षटकार आणि तीन चौकारांसह ३८ धावा काढून माघारी गेला. संघाचा ११८ धावांवर तिसरी विकेट्स गेली. त्यानंतर साहिबजादा फरहानने शादाब खानसह ४० चेंडूत ८१ धावांची अखंड भागीदारी करून पाकिस्तानला मोठी धावसंख्या गाठून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.
Pakistan seal the final #T20WorldCup Super 8 spot with a solid victory over Namibia 👊 📝: https://t.co/ig0UhhTcFP pic.twitter.com/XnqUAqOTvK — ICC (@ICC) February 18, 2026
साहिबजादा फरहान ५८ चेंडूत चार षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने नाबाद १०० धावा केल्या. टी२० विश्वचषकात शतक करणारा फरहान दुसरा पाकिस्तानी खेळाडू ठरला असून हा कारनामा अहमद शहजादने आधी केला होता. शेवटी, शादाबने २२ चेंडूत तीन षटकार आणि एका चौकारासह नाबाद ३६ धावा फटकावल्या. नामिबियाकडून जॅक ब्रुसेलने ४८ धावांत २ बळी घेतले, तर कर्णधार गेरहार्ड इरास्मसने १ बळी टिपला.
पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग(टी-२० विश्वचषक २०२६ )करताना नामिबियाची सुरुवात चांगली झाली नाही. नामिबिया संघाने ४९ धावांवर आपल्या चार विकेट गमावल्या. त्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांनी नामिबियाला पुनरागमन करण्याची संधीची दिली नाही. नामिबियाचा संघ १७.३ षटकांत फक्त ९७ धावांवर गारद झाला. संघाकडून लॉरेन स्टीनकॅम्पने २३ धावांचे योगदान दिले, तर अलेक्झांडर वोल्शेंकने २० धावा करून बाद झाला. याशिवाय, इतर कोणताही फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यात यश आले नाही. पाकिस्तानकडून उस्मान तारिकने ३.३ षटकांत १६ धावा मोजत ४ बळी टिपले, तर शादाब खानने ३ बळी घेतले. सलमान मिर्झा आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी १ बळी घेतला आहे.






