
Pune District Table Tennis Tournament 2026
प्रभात रस्ता येथील सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटरच्या टेबल टेनिस हॉलमध्ये या स्पर्धेतील चुरशीच्या अंतिम फेऱ्या पार पडल्या.११ वर्षांखालील मुलींचा गटामध्ये अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित शगुन गणेशे हिने अव्वल मानांकित शरण्या पटवर्धनचा ९-११, ११-६, ११-७, ११-८ अशा फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले. शगुन ही माऊंट लिटर स्कूलमध्ये इयत्ता ५ वीत शिकत असून, चॅम्पियन्स टेबल टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक तेहसीन अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
११ वर्षांखालील मुलांचा गट अव्वल मानांकित स्वयम कोठावळे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तिसऱ्या मानांकित आरव बापटचा ११-४, ८-११, ११-६, ११-३ अशा गेमने पराभव केला आणि विजेतेपदाचा मान मिळवला. स्वयम हा अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ५ वीचा विद्यार्थी असून, तो हिराबाग टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक नेहा कोठावळे यांच्याकडे सराव करतो.
१३ वर्षांखालील मुलींचा गटात दुसऱ्या मानांकित स्पृहा गुजर हिने चुरशीच्या लढतीत चौथ्या मानांकित आहाना गोडबोलेवर ११-९, ८-११, १२-१०, ११-७ अशी मात करत विजेतेपदाला गवसणी घातली. शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ७ वीत शिकणारी स्पृहा ही शारदा टॉस टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक मकरंद साने व दीपेश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. १३ वर्षांखालील मुलांचा गटामध्ये अव्वल मानांकित वरदान कोलते याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत दुसऱ्या मानांकित नभ पांचोलीयाचा ११-६, ११-३, ११-७ असा सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला. वरदान हा एड्युकॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ६ वीत शिकत असून, क्रीडा प्रबोधिनी टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक अनिल बांदेल यांच्याकडे सराव करतो.
स्पर्धेतील सर्व विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना आकर्षक करंडक देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभास सिम्बॉयसिसचे संचालक डॉ. अमेय येरवडेकर, सिम्बॉयसिस सेंटर ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशनच्या संचालिका अमृता (येरवडेकर) रुईकर, सिम्बॉयसिसचे मुख्य वित्त उपअधिकारी (डेप्युटी सीएफओ) सुनील जैन, युनियन बँकेचे रिजनल हेड अभिषेक जैन, इंडियन बँकेचे सहायक सरव्यवस्थापक दीपक अरोरा, सिम्बॉयसिस स्कूल सेंट्रल संचालिका डॉ. गार्गी मित्रा, पीडीटीटीएच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस, सचिव श्रीराम कोनकर, सिम्बॉयसिस स्कूलच्या मुख्याध्यापिका वीणा हवनुरकर आणि मुख्य पंच मधुकर लोणारे आदी मान्यवर उपस्थित होते.