पी व्ही सिंधु(फोटो-सोशल मीडिया)
Hong Kong Open Super 500 : भारताची दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी झालेल्या हाँगकाँग ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेतून तिचे आव्हान संपुष्टात आले आहे. तर भारताच्या एचएस प्रणॉय आणि लक्ष्य सेन यांनी संघर्षमी लढती जिंकून पुढील फेरीत धडक मारली आहे. मागील महिन्यात बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलेल्या पी व्ही सिंधूला ३२ च्या राउंड-ऑफ-३२ सामन्यात एका तासापेक्षा कमी वेळात डेन्मार्कच्या खालच्या क्रमांकाच्या बिगरमानांकित लाइन क्रिस्टोफरसनकडून २१-१५, १६-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला.
जागतिक क्रमवारीत ३४ व्या क्रमांकावर असणाऱ्या प्रणॉयने चीनच्या लू गुआंग जूचा ४४ मिनिटांत २१-१७, २१-१४ असा पराभव केला, तर सेनने २२-२०, १६-२१, २१-१५ असा विजय मिळवत पुरुष एकेरीच्या प्री-क्वाट र फायनलमध्ये आपलेस्थान निश्चित केले आहे. किरण जॉर्जनेही सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा ३४ मिनिटांत २१-१६, २१-११ असा पराभव करून पुरुष एकेरीच्या अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत ३१ व्या स्थानावर असलेल्या आयुष शेट्टीने एका तासापेक्षा थोडा जास्त काळ चाललेल्या या चुरशीच्या सामन्यात चायनीज तैपेईच्या सू ली यांगचा १५-२१, २१-१९, २१-१३ असा पराभव करून प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. २५ वर्षीय क्रिस्टोफरसनविरुद्ध सिंधूचा हा सहा सामन्यांतील पहिला पराभव आहे. तिला हा पराभव अशा वेळी सहन करावा लागला आहे जेव्हा ती फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत देत होती. या वर्षाच्या सुरुवातीला स्विस ओपन आणि जपान ओपनच्या पहिल्या फेरीतच भारतीय स्टार खेळाडू बाहेर पडली होती.
हेही वाचा : मोठी बातमी! IND VS PAK सामन्यावर बहिष्कार? माजी क्रिकेटपटूने थोपटले दंड; म्हणाला, ‘सामना पाहणार नाही..
पहिल्या गेममध्ये पी व्ही सिंधूने सुरुवातीला ३-१ अशी आघाडी घेतली होती, परंतु त्यानंतर डॅनिश खेळाडूने ५-५ अशी बरोबरी साधण्यात यश मिळवले. त्यानंतर सिंधूने तिच्या खेळाची पातळी वाढवली आणि सलग गुण मिळवत पहिला गेम आपल्या नावे केला. दुसऱ्या गेममध्ये भारतीय खेळाडू १३-१२ ने पुढे होती, परंतु त्यानंतर तिने सलग पाच गुण गमावले. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना कठीण आव्हान दिले. या सामन्यात, दोन्ही खेळाडू एकेकाळी १९-१९ अशा बरोबरीत होते. परंतु क्रिस्टोफरसनने सलग दोन गुण मिळवून सिंधूचा प्रवास येथेच संपवला