Arshdeep Singh along with Ravi Bishnoi shine in ICC T20 rankings! Three Indian players secure top-10 positions
ICC T20 rankings : आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरवात झाली असून काल झालेल्या सलामीच्या लढतीत अफगाणिस्तानने हाँगकाँगचा ९४ धावांनी पराभव केला. त्यांतर आज १० सप्टेंबर रोजी भारताचा सामना यूएईसोबत असणार आहे. या सामन्यापूर्वी भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयसीसीकडून ताज्या रँकिंग जाहीर केल्या आहेत. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या टी२० रँकिंगमध्ये भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांनी मोठी झेप घेतली आहे. रवी बिश्नोई गोलंदाजी क्रमवारीत सहाव्या आणि अर्शदीप सिंग १० व्या स्थानावर येऊन पोहचला आहे.
त्याच वेळी, भारताचा मिस्ट्री फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचे रँकिंगमध्ये चौथे स्थान कायम आहे. चक्रवर्ती हा भारताचा टी २० मधील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याच वेळी, अक्षर पटेलला देखील ताज्या रँकिंगमध्ये एका स्थानाचा फायदा होऊन तो १३ व्या स्थानावर पोहोचला आहे. आयसीसी टी२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीमध्ये टॉप-१० मध्ये तीन भारतीय गोलंदाजांचा समावेश आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : UAE विरुद्धच्या सामन्यापूर्वी अभिषेक शर्माने फोडली ‘डरकाळी’; केली षटकरांची आतिषबाजी..
तर दुसरीकडे, फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर, अभिषेक शर्मा फलंदाजी क्रमवारीमध्ये ८२९ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे, तर तिलक वर्मा दुसऱ्या स्थानावर आहे आणि कर्णधार सूर्यकुमार यादव सहाव्या स्थानावर विराजमान आहे. आशिया कपसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघात स्थान मिळवू न शकलेला यशस्वी जयस्वाल मात्र एका स्थानाने घसरून ११ व्या स्थानी गेला आहे. आशिया कपसाठी राखीव खेळाडूंमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.
ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन या दोघांना देखील एका स्थानाचा फायदा होऊन अनुक्रमे हे दोघे २६ व्या आणि ३४ व्या स्थानावर आहेत. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पंड्या २५२ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारतीय संघ आजपासून यूएईविरुद्ध सामना खेळून आशिया कपमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. अशा परिस्थितीत, येत्या काळात रँकिंगमध्ये मोठा बदल दिसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Asia Cup 2025 : हाँगकाँगविरुद्ध azmatullah omarzai च्या नावे विक्रमाची नोंद! असे करणारा अफगाणिस्तानचा ठरला पहिलाच खेळाडू
एकदिवसीय क्रमवारीमध्ये शुभमन गिल भारतीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी विराजमान आहे. तर कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. तसेच विराट कोहली चौथ्या तर श्रेयस अय्यर आठव्या स्थानी आहे. एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कुलदीप यादव एका स्थानाचे नुकसान सहन करून चौथ्या स्थानावर गेला आहे तर रवींद्र जडेजा दोन स्थानांनी घसरून दहाव्या स्थानी पोहचला आहे. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनीही प्रत्येकी दोन स्थानांची घसरण होऊन अनुक्रमे १४ व्या आणि १५ व्या स्थानावर पोहचले आहेत.