Sachin Tendulkar : स्वच्छ भारत मोहिमेला सचिनची साथ; कचरा व्यवस्थापनासाठी Recykal सोबत नवी भागीदारी, सौजन्य : आयएएनएस
भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आता पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाच्या मोहिमेत सहभागी झाला आहे. भारतातील कचरा व्यवस्थापन आणि सर्क्युलर इकॉनॉमी क्षेत्रात कार्यरत असलेल्या Recykal या तंत्रज्ञान कंपनीमध्ये सचिनने रणनीतिक गुंतवणूक केली आहे. देशातील एक अब्ज लोकांमध्ये कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापराबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
Recykal ने 13 नोव्हेंबर रोजी यासंदर्भात घोषणा केली. कंपनीने यापूर्वी जून 2026 मध्ये 23 दशलक्ष अमेरिकी डॉलरची (सुमारे 190 कोटी रुपयांची) ब्रिज फंडिंग उभारली होती. सचिन तेंडुलकरची गुंतवणूक ही याच निधी उभारणीचा विस्तार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
या भागीदारीच्या माध्यमातून कचरा ही केवळ फेकून देण्याची वस्तू नसून त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो, हा विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कचरा संकलन, पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक सवयी दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्यावर भर दिला जाणार आहे.
या सहकार्याबाबत सचिन तेंडुलकर म्हणाला की, माझ्या संपूर्ण कारकिर्दीत शिकलो की, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शिस्तीतूनच दीर्घकालीन यश मिळते. स्वच्छ भारत घडवण्यासाठीही हेच तत्त्व लागू होते. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील समस्येवर उपाय शोधण्याची Recykal ची भूमिका मला भावली. एक अब्ज लोकांमध्ये जबाबदार वर्तनाची सवय निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट मला विशेष भावले.
रणनीतिक गुंतवणूकदार म्हणून सचिन देशभरात जबाबदार कचरा व्यवस्थापनाची चळवळ उभी करण्यासाठी योगदान देणार आहे. कचरा योग्य ठिकाणी जमा करणे, पुनर्वापरासाठी पाठवणे आणि सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे यासाठी जनजागृती केली जाणार आहे.
Recykal चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक अभय देशपांडे यांनीही या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त केला. तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स आणि नागरिकांच्या वर्तनातील बदल यांच्या माध्यमातून पॅकेजिंग कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करता येईल, असे त्यांनी सांगितले. सचिनच्या शिस्तीचा, प्रामाणिकपणाचा आणि लोकांना एकत्र आणण्याच्या क्षमतेचा या मोहिमेला फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
2015 मध्ये स्थापन झालेली Recykal ही हैदराबादस्थित कंपनी डिजिटल प्लॅटफॉर्म, डिपॉझिट रिटर्न सिस्टीम (DRS) आणि पुनर्वापर योग्य साहित्याच्या व्यापाराच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीने आतापर्यंत 30 लाख मेट्रिक टनांहून अधिक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी योगदान दिले आहे. तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर, सॅमसंग आणि बीएमडब्ल्यू यांसारख्या 650 ब्रँड्ससह पाच हजारांहून अधिक कचरा संकलक आणि पुनर्वापर करणाऱ्यांसोबत कंपनी काम करत आहे.
Ans: सचिन तेंडुलकरने भारतातील कचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या Recykal या कंपनीत रणनीतिक गुंतवणूक केली आहे.
Ans: देशातील एक अब्ज लोकांमध्ये कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक सवयी निर्माण करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
Ans: कंपनीने जून 2026 मध्ये 23 दशलक्ष अमेरिकी डॉलरची ब्रिज फंडिंग उभारली होती.






