
रविंद्र जडेजा तोडणार धोनीचा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
या दमदार अष्टपैलू कामगिरीबद्दल रवींद्र जडेजाला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. आयपीएलमधील हा जडेजाचा १७वा सामनावीर पुरस्कार होता आणि त्याच्या कारकिर्दीतील राजस्थानसाठीचा हा पहिलाच पुरस्कार होता. यापूर्वी, जडेजाला चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना १६ वेळा सामनावीर म्हणून गौरविण्यात आले होते. त्यामुळे, जर जडेजाने आणखी एक सामनावीर पुरस्कार जिंकला, तर तो महान महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी करेल. आयपीएलमध्ये धोनीला १८ वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले आहे. दरम्यान जडेजाची कामगिरी अशीच राहिली तर तो लवकरच धोनीचा रेकॉर्ड मोडू शकतो. रविंद्र जडेजाच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच मोठी बातमी आहे.
विराट कोहली यादीत अव्वल
आयपीएलमध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दिग्गज विराट कोहली अव्वल स्थानी आहे. आरसीबीकडून खेळताना विराटला एकूण २१ वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले आहे. या यादीत मुंबई इंडियन्सचा दिग्गज रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एकूण १९ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. या यादीत धोनी तिसऱ्या, जडेजा चौथ्या, तर माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण १६ ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारांसह पाचव्या स्थानावर आहे.
गुणतालिकेत राजस्थान दुसऱ्या स्थानावर
रवींद्र जडेजाच्या दमदार कामगिरीमुळे राजस्थानने लखनौ सुपरजायंट्सवर ४० धावांनी विजय मिळवला. या हंगामातील सात सामन्यांपैकी राजस्थानचा हा पाचवा विजय होता. १० गुणांसह संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. जर राजस्थानने आपल्या उर्वरित सात सामन्यांपैकी दोन सामने जिंकले, तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरेल. यावर्षी राजस्थान रॉयल्सने आपली पकड मजबूत ठेवली आहे आणि त्यात रविंद्र जडेजाचाही मोठा वाटा आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही.