
ST Employees : एसटीतील कंत्राटी भरतीविरोधात एल्गार! श्रीरंग बरगे यांचा सरकारला थेट इशारा
ST Employees : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (ST) प्रस्तावित कंत्राटी भरतीविरोधात महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस आक्रमक झाली आहे. एसटी महामंडळात 17 हजार 742 चालक-वाहकांची कंत्राटी भरती करण्याऐवजी कायमस्वरूपी भरती करावी, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली.
सरकारने एसटीतील कायमस्वरूपी भरतीला परवानगी न दिल्यास क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
चांदूर रेल्वे येथे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बरगे बोलत होते. कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचारी विनोद वानखडे आणि धनंजय दुधाट यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अन्य संघटनांमधून महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात इंग्रज आणि सावकारांच्या शोषणाविरोधात संघर्ष उभा केला. जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी त्यांनी संघटित होऊन लढण्याची प्रेरणा दिली. अन्यायाविरुद्ध स्वाभिमानाने लढण्याचा त्यांचा आदर्श आजही महत्त्वाचा आहे, असे बरगे म्हणाले.
आज एसटी कर्मचाऱ्यांसमोरही अन्यायाचे संकट उभे आहे. एसटी महामंडळातील कंत्राटीकरण म्हणजे आधुनिक गुलामगिरीच आहे. त्यामुळे या धोरणाला कर्मचाऱ्यांनी संघटितपणे विरोध केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क संवर्गातील 16 हजार 717 पदांची कायमस्वरूपी भरती जाहीर केली आहे. तलाठी, लिपिक आणि कर सहायक अशा विविध पदांवर कायमस्वरूपी भरती केली जात आहे. मात्र, दुसरीकडे एसटी महामंडळात 17 हजार 742 चालक-वाहकांची कंत्राटी भरती करण्याची तयारी सुरू आहे. एका विभागात कायमस्वरूपी भरती आणि दुसऱ्या विभागात कंत्राटी भरती, ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप बरगे यांनी केला.
एसटी महामंडळात चालकांची 10 हजार 689 पदे रिक्त असल्याचा दावा बरगे यांनी केला. दापोडी कार्यशाळेत चालकांअभावी 700 बसेस उभ्या आहेत. त्यातच नव्या 8 हजार 300 बसेस दाखल होत आहेत. असे असतानाही सरकार कायमस्वरूपी भरतीला परवानगी देत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच एसटीचे 400 ते 500 चालक गेल्या पाच वर्षांपासून आरटीओच्या सेवेसाठी देण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
एसटी चालकाच्या हातात एकाच वेळी 50 पेक्षा अधिक प्रवाशांचा जीव असतो. अशा जबाबदारीच्या कामासाठी तीन वर्षांच्या कंत्राटावर अवघ्या 25 ते 30 हजार रुपये वेतनावर चालकांची नियुक्ती करणे म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करण्यासारखे आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीची हमी किंवा वेतनाची शाश्वती नसते. अशा मानसिक तणावात चालकाने वाहन कसे चालवायचे, असा सवाल बरगे यांनी उपस्थित केला.
निवृत्त कर्मचारी विनोद वानखडे आणि धनंजय दुधाट यांनी एसटीची अनेक वर्षे निष्ठेने सेवा केली. ऊन, पाऊस आणि सणवार अशा प्रत्येक परिस्थितीत त्यांनी प्रवाशांची सेवा केली. अशा कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे हेच भगवान बिरसा मुंडा यांना खरे अभिवादन असल्याचे बरगे म्हणाले.
सरकारने गट-क संवर्गातील 16 हजार 717 पदे कायमस्वरूपी भरण्याचा निर्णय घेतला असेल, तर एसटीतील 17 हजार 742 पदांची कायमस्वरूपी भरती का केली जात नाही? एसटी कर्मचारी हा दुसऱ्या दर्जाचा नागरिक आहे का? असा सवाल त्यांनी केला. एसटीतील कंत्राटी भरती रद्द करून कायमस्वरूपी भरती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बरगे यांनी दिला.
यावेळी संघटनेचे अमरावती विभागाचे अध्यक्ष जयंत मुळे, विभागीय सचिव संदीप मुळे यांच्यासह प्रवीण चरपे, विकी यादव, शिवदास स्वर्गे, राम अजमिरे, रणजीत तायडे, प्रमोद दिपटे, पंकज पांडव, प्रमोद गोदे, मंगेश पोलाड, धीरज कच्चवे, मंगेश आगाशे, उमेश म्हस्के, रुपेश कोकाटे, संदीप कुबडे, पुरुषोत्तम मोकाशे, रोशन मडगे, चंद्रकांत पर्वत, मीनाक्षी पुडके, रंजना कोल्हारे, वृषाली वाघमारे, पूनम ठाकरे, शुभांगी सारवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.