Champion trophy 2025: India always gets a painful sting from New Zealand in the final; Now Team India will take revenge for 'three' defeats..
Champion trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. अंतिम सामना ९ मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमने सामने उभे ठाकणार आहे. भारतीय संघाला अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध तीन बदले घ्यायचे आहेत. बाद फेरीत न्यूझीलंड संघाने नेहमीच भारतावर वर्चस्व राखले आहे. अशा स्थितीत भारतीय संघ न्यूझीलंडचा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघ 25 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत एकमेंकासमोर येणार आहेत. यापूर्वी 2000 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे नाव नॉकआउट ट्रॉफी असताना दोन्ही संघ एकमेकांशी समोरसमोर आले होते. ज्यामध्ये न्यूझीलंड संघाने बाजी मारली होती. केनियातील नैरोबी येथील मैदानावर हा सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये न्यूझीलंडने शेवटच्या षटकात ४ गडी राखून विजय मिळवला.
त्यानंतर न्यूझीलंडने आयसीसीच्या बाद फेरीत भारताला नेहमीच हैराण केले आहे. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात न्यूझीलंड आणि भारत यांच्यात उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली होती. त्यानंतर 2021 मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव करून टेस्ट चॅम्पियन बनले. या प्रसंगी न्यूझीलंड संघाने वर्चस्व गाजवले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यामध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा बदला घ्यावा लागणार आहे.
न्यूझीलंड संघाकडे केवळ मर्यादित षटकांची ICC ट्रॉफी आहे. 2000 साली न्यूझीलंडने भारताला पराभूत करून हे विजेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत भारताने केनिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर न्यूझीलंडने झिम्बाब्वे आणि पाकिस्तानचा पराभव केला होता. भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने 117 आणि सचिन तेंडुलकरने 69 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारतीय संघ 6 विकेट गमावून 264 धावांपर्यंतच मजल मारू शकला होता.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ख्रिस केर्न्सने ख्रिस हॅरिससह डावाची धुरा सांभाळली होती. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी करून भारताला सामन्यातून बाहेर फेकले होते. केर्न्सने 2 चेंडू शिल्लक असताना शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला होता.
2019 च्या विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी सर्वोत्तम राहिली होती. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे त्याचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंग झाले होते. पावसामुळे हा सामना दोन दिवस खेळवण्यात आला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 239 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये रॉस टेलरने 74 धावांची आणि केन विल्यमसनने 67 धावांची खेळी साकारली होती. भारतीय संघाकडून भुवनेश्वर कुमारने 3 आणि रवींद्र जडेजाने 1 बळी घेतला.
प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली होती. भारताच्या तीन विकेट्स स्वस्तात पडल्या. त्यानंतर भारतीय संघाला सावरताच आले नाही. रवींद्र जडेजाने शानदार खेळी करत भारतीय संघाने पुनरागमन केले. जडेजाने 77 धावांची खेळी खेळली. तर धोनीने 50 धावा केल्या होत्या. पण धोनी धावबाद झाल्यामुळे भारतही सामन्यातून बाद झाला. या सामन्यात न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 3 आणि ट्रेंट बोल्टने 2 बळी घेतले होते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला हंगाम 2021 मध्ये खेळवण्यात आला. या हंगामात भारतीय संघाने चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली होती. दुसरीकडे, न्यूझीलंडने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले होते. अंतिम सामन्यात भारतीय संघाला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले होते
भारतीय संघ 9 मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात न्यूझीलंड सोबत भिडणार आहे. भारत विजेतेपद मिळवून या तीन सामन्यांचा बदला घेण्याच्या हेतूने मैदान गाजवणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ ज्याप्रकारे कामगिरी करत आहे, त्यावरून हा सामना भारत सहज जिंकेल असे वाटत आहे. मात्र, भारताला फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. तसेच प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे.