
२०२३ मध्ये ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. यावेळचा आशिया कप टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल, ज्यात एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. मागील १६ हंगामांमध्ये अनेक विक्रमांची नोंद झाली असून, त्यातील काही विक्रम मोडणे जवळपास अशक्य आहे. विशेष म्हणजे, या यादीत भारताच्या ३ खेळाडूंचा दबदबा आहे.
आशिया कपच्या वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक शिकार करण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. धोनीने २४ सामन्यांमध्ये ४३ खेळाडूंना बाद केले आहे. यामध्ये वनडेमधील ३६ (२५ झेल आणि ११ स्टंपिंग) आणि टी-२० मधील ७ (६ झेल आणि १ स्टंपिंग) यांचा समावेश आहे. हा विक्रम मोडणे कोणत्याही यष्टीरक्षकासाठी मोठे आव्हान आहे.
एकाच आशिया कप हंगामात यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक शिकार करण्याचा विक्रम देखील महेंद्रसिंग धोनीच्याच नावावर आहे. २०१० मध्ये धोनीने १२ शिकार करत हा विक्रम प्रस्थापित केला होता, जो आजही अबाधित आहे.
आशिया कपमधील कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वात मोठी वैयक्तिक खेळीचा विक्रम भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या नावावर आहे. २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने १८३ धावांची तुफानी खेळी करत हा विक्रम रचला होता.
आशिया कपमधील सर्वात प्रभावी गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा फिरकीपटू अजंथा मेंडिसच्या नावावर आहे. २००८ मध्ये भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने केवळ १३ धावा देत ६ बळी घेतले होते. त्याच्या या गोलंदाजीमुळे भारतीय संघ ३० धावांनी पराभूत झाला होता.
आशिया कपमध्ये सलामीच्या फलंदाजांनी केलेली सर्वात मोठी भागीदारी पाकिस्तानच्या मोहम्मद हफीज आणि नासिर जमशेद यांच्या नावावर आहे. २०१२ च्या आशिया कपमध्ये भारताच्या विरोधात या दोन्ही फलंदाजांनी २२४ धावांची दमदार सलामी भागीदारी केली होती, जो आजही एक विक्रम आहे.