India Beat Pakistan: भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने हरवून २०२५ चा आशिया कप जिंकला. टीम इंडिया नवव्यांदा आशियाई चॅम्पियन बनली. अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १४६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, भारतीय संघाने शेवटच्या षटकात सामना जिंकला. तिलक वर्मा हा भारताच्या विजयाचा खरा हिरो होता, त्याने ६९ धावांची अर्धशतक झळकावली. गोलंदाजीत कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या.
India do it, yet again 🏏 Asia Cup final SCORECARD ➡️ https://t.co/6yhNKeDomw pic.twitter.com/bJMANYitMY — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 28, 2025
पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताच्या २० धावांवर ३ विकेट पडल्या होत्या. अशा परिस्थितीत तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी महत्त्वाची ५७ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ७७ धावांवर असताना सॅमसन २४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर शिवम दुबे फलंदाजीला आला. तिलक वर्माच्या साथीने त्याने शानदार फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात तिलकने तुफानी फलंदाजी करताना नाबाद ६९ धावा केल्या, ज्यात ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. शिवम दुबेनेही ३३ धावांचे योगदान दिले.
दुबईमध्ये पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान आणि फखर जमान या सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची मोठी भागीदारी केली. मात्र, वरुण चक्रवर्तीने पहिली विकेट मिळवताच भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीमुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ केवळ १४६ धावांवर गारद झाला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
कुलदीप यादवने आपल्या शानदार गोलंदाजीने पाकिस्तानची मोठी भागीदारी तोडली. त्याने फखर जमान आणि सईम अयुब यांसारख्या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले. याशिवाय, सलमान आगा, फहीम अशरफ आणि शाहीन अफ्रिदी यांनाही त्याने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या स्पर्धेत कुलदीप यादवने आतापर्यंत १७ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामुळे तो स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.