
नवी दिल्ली– ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia-India) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar) ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना (Test match) आजपासून (शुक्रवारी) सकाळी साडेनऊ वाजता नवी दिल्लीत सुरू होणार आहे. टीम इंडियाने 2023 चा हा दुसरा कसोटी सामना आजपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु होत आहे. एकीकडे भारतावर कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचण्याचे दडपण आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियालाही १९ वर्षांनंतर भारतात मालिका जिंकण्याची इच्छा आहे. पहिला सामना भारताने एक डाव आणि मोठ्या फरकाने जिंकला होता. फक्त तीन दिवसात हा सामना संपला होता. त्यामुळं दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचे असणार आहे. भारताने सलग ३ वेळा या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. तर कांगारुवर आजच्या सामना जिंकण्यासाठी दबाव असणार आहे. कारण पहिल्या सामन्यात कांगारुंना दारुण पराभवाला सामोरी जावे लागले. फलंदाजी भारताच्या फिरकीसमोर तग धरु शकली नाही.
पहिल्या कसोटीत भारताचा मोठा विजय…
पहिल्या कसोटी सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकला ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि १३२ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूं पुढे नांग्या टाकल्याने त्यांना हा पराभव पत्करावा लागला. दिल्ली कसोटीआधी बोलताना ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सने संघात बदल होण्याची हिंट दिली. त्याने मधल्या फळीतील फलंदाज ट्रेविस हेडबद्दल बोलताना म्हटले,“हेड सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याची मागील वर्षातील कामगिरी उत्कृष्ट होती. त्याचा संघात समावेश करण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे.”
…तर भारत अव्वल स्थानी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. ही मालिका जर भारताने ३-० किंवा ३-४ अशा फरकाने जिंकली तर त्यांना विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळं आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे.
इतिहास काय सांगतो?
28 नोव्हेंबर 1948 रोजी दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला. तेव्हापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 102 कसोटी सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने 43, तर भारताने 30 सामने जिंकले. एकूणच ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड चांगला आहे, पण मायदेशात भारतीयांनी ऑस्ट्रेलियावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे.
भारताची गोलंदाजी कशी असणार?
पहिल्या सामनात भारताने फिरकिच्या जोरावर सामना जिंकला होता. त्यामुळं या सामन्यात फिरकी प्रभावी ठरणार का, हे पाहवे लागेल. भारताकडे चार वेगवान गोलंदाज आहेत. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट आहेत. त्यापैकी केवळ दोघांनाच कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे. दोन फिरकीपटूसोबत टिम इंडिया मैदानात उतरेल. तर भारतीय संघाची ताकद फिरकी आहे. संघाच्या फिरकी आक्रमणाची धुरा रविचंद्रन अश्विनकडे असेल. त्याच्यासोबत रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव किंवा अक्षर पटेल यांच्यावर असेल.
विराट, रोहित व पुजारा यांच्यावर मदार…
फलंदाजीकडे बघितले तर रोहितने पहिल्या कसोटी शानदार शकत ठोकल्याने त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. चेतेश्वर पुजाराला सूर गवसला नाही. पण या सामन्यात तो चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे. विराट कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचे कसोटी शतक झळकावले. यानंतर त्याच्या बॅटमधून 6 अर्धशतके झाली, पण एकही शतक झाले नाही. तसेच पहिल्या कसोटीत कोहली लवकर बाद झाला.
या खेळाडूला मिळणार संधी?
भारतीय संघाचा सलामीवर मयंक अग्रवाल सध्या संघातून बाहेर आहे. मयंक अग्रवाल याने 12 मार्च 2022 रोजी श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. त्यानंतर मयंकला एकही सामना खेळता आले नाही. त्यामुळे मयंक पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कर्नाटक संघाचे नेतृत्व करत असून, या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मयांकने सौराष्ट्रविरुद्ध शतक झळकावले. या शतकानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन करण्याचा दावा केला.
सामना कसा व कुठे पाहता येणार?
भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० पासून सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच ९ वाजता नाणेफेक होईल. थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर पाहता येईल.
संभाव्य भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
संभाव्य ऑस्ट्रेलियाचा संघ-
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, एलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कर्णधार), एश्टन एगर, नाथन लियोन, मिचेल स्वेपसन, स्कॉट बोलँड