
वेस्ट इंडिजचे अष्टपैलू खेळाडू सर गार्फिल्ड सोबर्स यांचे निधन; क्रिकेट जगतावर शोककळा
नवी दिल्ली : क्रिकेट जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू खेळाडू गारफील्ड सोबर्स यांचे निधन झाले. सोबर्स यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सोबर्स यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी आणि एक एकदिवसीय सामना खेळला होता.
२८ जुलै १९३६ रोजी बार्बाडोस येथे जन्मलेल्या सर गारफील्ड सोबर्स यांनी १६० कसोटी डावांमध्ये ५७.७८ च्या सरासरीने ८०३२ धावा केल्या. या काळात त्यांनी ३० अर्धशतके आणि २६ शतकेही झळकावली. क्रिकेटच्या या प्रकारातील त्याची सर्वोत्तम धावसंख्या ३६५ नाबाद होती. वेस्ट इंडिजचा हा महान अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीतही पारंगत होते. त्यांनी ९३ कसोटी सामन्यांमध्ये १५९ डावांत २३५ बळी घेतले. त्यांची गोलंदाजीची सरासरी ३४.०३ आणि इकॉनॉमी रेट २.२२ होता. त्यांनी सहा वेळा ५ बळी आणि आठ वेळा ४ बळी घेण्याचा विक्रमही केला. एका सामन्यातील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ८/८० आहे.
दरम्यान, वेस्ट इंडिज क्रिकेटने सोबर्स यांच्या निधनाची माहिती दिली. बोर्डाने सोशल मीडियावर लिहिले, “एका शानदार खेळीचा युगाचा अंत झाला आहे. सर गार्फिल्ड सोबर्स आता आणि कायम आमच्या हृदयात राहतील”.
एकदिवसीय सामनाही खेळला
सोबर्सने ५ सप्टेंबर १९७३ रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांच्या कारकिर्दीतील या एकमेव एकदिवसीय सामन्यात त्याने एकही धाव केली नाही. मात्र, त्यांनी १ बळी घेतला. वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी ३८३ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये २८३१४ धावा केल्या असून, १०४३ बळी घेतले आहेत, तर ९५ लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने २७२१ धावा आणि १०९ बळी मिळवले आहेत.
क्रिकेटमधील सर्वात परिपूर्ण खेळाडूंपैकी एक
सर गारफील्ड सोबर्स यांचा जन्म २८ जुलै, १९३६ रोजी बार्बाडोस येथे झाला. त्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाने क्रिकेटला एक नवी ओळख दिली. ते एक उत्कृष्ट फलंदाज होते आणि वेगवान-मध्यम गती तसेच फिरकी गोलंदाजी या दोन्हीमध्ये ते पारंगत होते. मैदानातील त्यांची चपळाई आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे ते त्यांच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक बनले. या अष्टपैलूपणामुळे ते क्रिकेटमधील सर्वात परिपूर्ण खेळाडूंपैकी एक ठरले.