
Carrom Tournament : 40 वर्षांनंतर विलिंग्डन जिमखान्यात राज्यस्तरीय कॅरमचा थरार; 342 खेळाडूंचा सहभाग
Carrom Tournament : विलिंग्डन कॅथलिक जिमखान्याच्या वतीने आयोजित पहिल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला शनिवार, 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पुरुष आणि महिला एकेरी गटांत राज्यभरातील तब्बल 342 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. पुरुष एकेरीत मुंबईच्या प्रशांत मोरेला, तर महिला एकेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरला प्रथम मानांकन देण्यात आले आहे.
या स्पर्धेची सुरुवात शनिवारी सकाळी 9 वाजता पुरुष एकेरी गटातील सामन्यांनी होणार आहे. महिला एकेरी गटातील सामने रविवार, 15 नोव्हेंबर रोजी दुपारनंतर खेळवण्यात येतील. सुमारे 40 वर्षांपूर्वी जिमखान्याने राज्यस्तरीय निमंत्रित कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याने आयोजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पुरुष एकेरी गटात मुंबईच्या प्रशांत मोरेला पहिले मानांकन देण्यात आले आहे. पुण्याचा अभिजित त्रिपनकर दुसऱ्या, ठाण्याचा झैद अहमद तिसऱ्या, तर मुंबईचा महम्मद घुफ्रान चौथ्या क्रमांकावर आहे. निलांश चिपळूणकर, रहिम खान, सागर वाघमारे आणि संदीप दिवे यांनाही अनुक्रमे पाचवे ते आठवे मानांकन मिळाले आहे.
महिला एकेरी गटात ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरला पहिले मानांकन देण्यात आले आहे. ठाण्याची मधुरा देवळे दुसऱ्या, पालघरची श्रुती सोनावणे तिसऱ्या, तर सिंधुदुर्गची केशर निर्गुण चौथ्या क्रमांकावर आहे. सोनाली कुमारी, आकांक्षा कदम, ऐशा साजिद खान आणि प्राजक्ता नारायणकर यांना पाचवे ते आठवे मानांकन देण्यात आले आहे.
स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब चॅनेलवरून करण्यात येणार आहे. किशोर वागळे आणि मंदार बर्डे हे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये सामन्यांचे समालोचन करणार आहेत.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने आंतरराष्ट्रीय पंच अजित सावंत यांची प्रमुख पंच म्हणून, तर राज्यस्तरीय पंच योगेश सावंत यांची सहाय्यक प्रमुख पंच म्हणून नियुक्ती केली आहे. आंतरराष्ट्रीय पंच केतन चिखले तांत्रिक संचालक म्हणून काम पाहणार असून, अरुण केदार स्पर्धा संचालक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्यांना जिमखान्याच्या वतीने एकूण १ लाख १० हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेच्या कालावधीत खेळाडू, पंच आणि पदाधिकाऱ्यांना जिमखान्यातील विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती जिमखान्याचे मानद क्रीडा सचिव ऑलिम्पियन जोकीम कार्व्हालो आणि संयुक्त क्रीडा सचिव ऑलिम्पियन मर्विन फेर्नांडिस यांनी दिली.
Ans: पहिली राज्य मानांकन कॅरम स्पर्धा शनिवार, 14 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे.
Ans: पुरुष आणि महिला एकेरी गटांत मिळून राज्यातील एकूण 342 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
Ans: महत्त्वाच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.