
Maharashtra Open : महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत मानांकितांचा धडाका; विनय पाटील, हर्षित महिमकर विजयी
Maharashtra Open : बॉम्बे जिमखाना येथे सुरू असलेल्या बॉम्बे जिमखाना प्रस्तुत योनेक्स-सनराइज महाराष्ट्र ओपन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी मानांकित खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत ठाण्याचा अग्रमानांकित विनय पाटील आणि ग्रेटर मुंबईचा तिसरा मानांकित हर्षित महिमकर यांनी सरळ गेममध्ये विजय मिळवत आगेकूच केली. याशिवाय चौथा मानांकित वेद भोईर, पाचवा मानांकित हिमांशू हरदेव आणि सहावा मानांकित कृष्णा मजेठिया यांनीही विजयी सुरुवात केली.
पुरुष एकेरीत विनय पाटीलने रायगडच्या शौर्य म्हापणकरचा 15-9, 15-9 असा पराभव केला. हर्षित महिमकरने नाशिकच्या रोमीत रॉयवर 15-1, 15-7 अशी सहज मात केली. नागपूरच्या हिमांशू हरदेवने ठाण्याच्या सादिक चौधरीविरुद्ध वॉकओव्हरद्वारे विजय मिळवला. नाशिकच्या कृष्णा मजेठियाने ठाण्याच्या विराज वाघेलाचा 15-4, 15-5 असा पराभव केला. ठाण्याच्या वेद भोईरने साताऱ्याच्या कृष्णा जाधवला 15-8, 15-7 असे नमवले.
17 वर्षांखालील मुलींच्या एकेरीतही बहुतांश सामने एकतर्फी झाले. मात्र, मुंबई उपनगरच्या साईली केसरकर आणि सोलापूरच्या अनुष्री भट्ट यांच्यातील सामना तीन गेमपर्यंत रंगला. साईलीने 17-15, 15-17, 15-9 अशी बाजी मारत पुढील फेरीत प्रवेश केला. सौम्या मंगावकरने ठाण्याच्या पहल तन्नाचा 15-11, 15-3 असा, तर ठाण्याच्या शुभ्रा कुलकर्णीने ग्रेटर मुंबईच्या शान्वी शाहचा 15-2, 15-2 असा पराभव केला. पुण्याच्या इशान्वी काळेने ग्रेटर मुंबईच्या फिओना भथेना हिला 15-3, 15-3 असे नमवले.
17 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत पालघरच्या दुसऱ्या मानांकित प्रतीक जगतापने ठाण्याच्या शौर्य सोनकरवर 13-15, 15-9, 15-1 अशी मात केली. ग्रेटर मुंबईच्या सहाव्या मानांकित अनमोल शर्माने मुंबई उपनगरच्या रियान बॉटलवाला याचा 15-0, 15-0 असा धुव्वा उडवला.
मिश्र दुहेरीत ग्रेटर मुंबईच्या अविनाश आणि प्रांजल अंधारे यांनी ठाणे-मुंबई उपनगरच्या कृष्णेंदू कुंडू आणि अँटोनेला ब्रिया यांच्यावर 15-10, 15-13 अशी मात केली. पुरुष दुहेरीत ग्रेटर मुंबईच्या नेव्हिल कातिला आणि तिलक कानुंगो यांनी मुंबई उपनगरच्या मानस साळियन आणि शॉन पिंटो यांचा 15-3, 15-4 असा पराभव केला. तर मुंबई उपनगरच्या आर्यन वर्मा आणि इथन डिसूझा यांनी ग्रेटर मुंबईच्या आकाश शाह आणि अक्षय शाह यांच्यावर 10-15, 15-11, 15-7 अशी मात केली.
Ans: ही स्पर्धा मुंबईतील बॉम्बे जिमखाना येथे आयोजित करण्यात आली आहे.
Ans: विनय पाटील, हर्षित महिमकर, वेद भोईर, हिमांशू हरदेव आणि कृष्णा मजेठिया यांनी पहिल्या फेरीत विजय मिळवला.
Ans: ग्रेटर मुंबईच्या नेव्हिल कातिला आणि तिलक कानुंगो यांनी मानस साळियन आणि शॉन पिंटो यांचा 15-3, 15-4 असा पराभव केला.