
Chess Championship : बुद्धिबळाच्या पटावर मानांकितांचा झंझावात, 387 युवा खेळाडूंचा राज्य शालेय अजिंक्यपदासाठी संघर्ष
Chess Championship: बुद्धिबळाच्या पटावर अचूक चाली, आक्रमक डावपेच आणि विजयासाठीची जिद्द दाखवत मानांकित युवा बुद्धिबळपटूंनी महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात धडाकेबाज सलामी दिली. पहिल्याच दोन फेऱ्यांत अनेक अग्रमानांकितांनी सलग विजय नोंदवत आपले वर्चस्व सिद्ध केले. मात्र, कमी मानांकनाच्या आणि बिगरमानांकित खेळाडूंनीही दिग्गजांना आव्हान देत स्पर्धेतील रंगत वाढवली आहे.
इंडियन चेस स्कूलच्या वतीने दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू झालेल्या या तीन दिवसीय स्पर्धेत 9, 13 आणि 17 वर्षांखालील खुल्या व मुलींच्या अशा सहा फिडे मानांकित गटांत तब्बल 387 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
नऊ वर्षांखालील खुल्या गटात अग्रमानांकित अध्वान ओसवाल (1724) आणि पहिल्या टप्प्यात सात वर्षांखालील विजेता ठरलेला इवान दुबे (1545) यांनी प्रत्येकी दोन विजयांसह आघाडी घेतली. वीर शाह, अथर्व मुळीक, आरव देशमुख आणि निवेश पांचाळ यांनीही दोन गुणांची कमाई केली. बिगरमानांकित धार्विक परब, शिवांश भाला, वीरेन बोरिचा आणि झियान फतनानी यांनीही लक्षवेधी कामगिरी केली.
9 वर्षांखालील मुलींच्या गटात लिया कृष्णन (1558) हिने सलग दोन विजयांसह आपला दबदबा कायम ठेवला. मिराई सरदाना, खानक गडा, लावण्या सिंग आणि बिगरमानांकित मानसी दानू यांनीही आघाडीच्या फळीत स्थान मिळवले.
13 वर्षांखालील खुल्या गटात एआयएम कश्यप खाखरिया (1789) याने विजयी सुरुवात केली. अर्जुन प्रभू, रितिक बोप्पा, मयन झा आणि आराध्य वाघ यांनीही आघाडीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवले.
13 वर्षांखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित त्वेषा जैन (1697) हिने दोन विजयांसह आपली ताकद दाखवली. प्रणिता भावा, महुआ देशपांडे, अरिहा देवरुखकर, निश्का अग्रवाल आणि तिस्या पट यांनीही संयुक्त आघाडी घेतली.
17 वर्षांखालील खुल्या गटात अग्रमानांकित एआयएम हृदय मनियार (1910) याने दोन्ही डाव जिंकत प्रतिस्पर्ध्यांना सावध केले. युवराज प्रताप सिंग, सोहम सहमाते, रोनित मोटवानी आणि बिगरमानांकित विहान सिंग यांनीही दोन गुण मिळवले.
सतरा वर्षांखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित दृश्या नाईक (1713) हिने सलग दोन विजयांची नोंद केली. इक्षा सोनी, त्रिशा जगताप आणि सायना नागरकट्टे यांनीही विजयी लय कायम राखली.
या स्पर्धेला राष्ट्रीय निवडीचे महत्त्व असल्याने आगामी फेऱ्यांतील प्रत्येक डाव निर्णायक ठरणार आहे. अहमदाबाद येथे 16 ते 20 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असून, प्रत्येक गटातील अव्वल दोन खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
Ans: या स्पर्धेत एकूण 387 युवा बुद्धिबळपटूंनी सहभाग नोंदवला आहे.
Ans: अध्वान ओसवाल, लिया कृष्णन, कश्यप खाखरिया, त्वेषा जैन, हृदय मनियार आणि दृश्या नाईक यांनी आपापल्या गटांत दमदार सुरुवात केली आहे.
Ans: प्रत्येक गटातील अव्वल दोन खेळाडूंची अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याकरिता निवड केली जाणार आहे.