iPhone Price Hike: नवा आयफोन ग्राहकांच्या खिशाला लावणार कात्री? लाँचपूर्वीच Tim Cook यांनी दिली मोठी हिंट
आतापर्यंत अनेकजण असा अंदाज वर्तवत होते की, आगामी आयफोन 18 आणि आयफोन 18 प्रो मॉडेल्स गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन मॉडेल्सच्या किंमतीत लाँच केले जाऊ शकतात. मात्र आता टिम कुक यांनी आशांवर पाणी फेरले आहे. टिम कुक म्हणाले आहे की, स्टोरेज आणि मेमोरी चिप यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे, याचा परिणाम आयफोनच्या किंमतीवर देखील होणार आहे. आगामी आयफोनच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत टिम कुक यांनी म्हटलं आहे की, दरवाढ थांबवता येणार नाही. आतापर्यंत आम्ही आमच्यावर येणारा भार संभाळत होतो आणि यापासून ग्राहकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र आता ही परिस्थिती संभाळली जाऊ शकत नाही. तथापी, यावेळी टिम कुक यांनी आयफोन 18 मॉडेल्सच्या किंमतींचा थेट उल्लेख केला नसला तरी देखील आता असं मानलं जात आहे की, आगामी काळात लाँच होणाऱ्या आयफोनसोबतच आयपॅडच्या किंमतीवर देखील मोठा परिणाम होऊ शकतो. हे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात.
समोर आलेल्या काही रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, अॅपल त्यांचा सध्याचा नफा टिकवून ठेवण्यासाठी आयफोन 18 प्रो च्या किंमतीत सुमारे 25 ते 30 हजार रुपयांची वाढ करू शकतो. कंपनी आयफोनच्या किंमती स्टोरेजच्या हिशोबाने ठरवू शकतो. आयफोन 17 प्रो च्या एक मॉडेलमध्ये 12GB रॅमसाठी कंपनीने 39 डॉलर म्हणजेच सुमारे 3700 रुपये दिले होते. मात्र आयफोन 18 प्रो मॉडेलमध्ये इतक्याच रॅमसाठी कंपनीला सुमारे 14,000 रुपये खर्च करावे लागू शकतात. बेस मॉडेलच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, स्टोरेजची किंमत 13 डॉलर म्हणजेच सुमारे 1228 रुपयांहून वाढून 51 डॉलर म्हणजेच सुमारे 4820 रुपये होण्याची शक्यता आहे.
कंपनीला आयफोन 17 प्रो चे पार्ट्स आणि उत्पादनासाठी 530 डॉलर म्हणजेच सुमारे 50,000 रुपये खर्च करावे लागले होते. मात्र आता मेमोरी चिप्सच्या किंमती वाढल्यामुळे कंपनीला आयफोन 18 प्रो मॉडेलच्या उत्पादनासाठी 726 डॉलर म्हणजेच सुमारे 69,000 रुपये खर्च करावे लागण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनी त्यांच्या आगामी आयफोनमध्ये अपग्रेडेड कॅमेरा सिस्टिम देण्याचा देखील विचार करत आहे. ज्यामुळे डिव्हाईसची किंमत आणखी वाढू शकते. कंपनीचे प्रॉफिट मार्जिन आणि प्राइसिंग स्ट्रॅटजीचा विचार केला तर आयफोन 18 प्रो अमेरिकेत 1399 डॉलर म्हणजेच सुमारे 1,32,244 रुपयांच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो.






