HP New Brand Ambassador: Ayushmann Khurrana बनला HP इंडियाचा नवा चेहरा, आगामी जाहिरातीत भावासोबत झळकणार!
हेवलेट पॅकार्ड म्हणजेच HP इंडियाने बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता आयुष्मान खुराना याची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. HP इंडिया ही लोकप्रिय आणि मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला आपला नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. आयुष्मान खुरानासोबतच अपारशक्ती खुराना देखील HP च्या नवीन जाहिरात मोहीमेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता टेक विश्वातील मोठं नाव असलेल्या HP च्या आगामी जाहिरात मोहिमेत आपल्याला दोन्ही भाऊ पाहायला मिळणार आहेत.
फेरारी आणि रिअल माद्रिद सारख्या दिग्गज कंपन्यांसोबत काम केल्यानंतर आता एचपी इंडियाने राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुराणाला त्यांच्या भारतीय मोहिमेचा चेहरा म्हणून निवडले आहे. आयुष्मान खुराना त्याच्या क्रांतिकारी आणि सामाजिक चित्रपटासाठी ओळखला जातो. बॉलीवूड विश्वातील हा प्रसिद्ध चेहरा आता टेक विश्वातील मोठ्या कंपनीच्या जाहिरातीत पाहायला मिळणार आहे. व्यक्तींना सक्षम बनवणाऱ्या आणि प्रगतीशील भविष्य घडवणाऱ्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे आहे, असं कंपनीच्या आगामी मोहिमेचं उदिष्ट्य आहे. (फोटो सौजन्य – instagram)
HP ने म्हटलं आहे की, आयुष्मान खुराना हे अखंडता, नेतृत्व, आणि सामाजिक जाणीव यांचे प्रतीक आहेत. या सर्व गोष्टी कंपनीच्या ब्रँड मूल्यांशी पूर्णतः सुसंगत आहे. UNICEF ब्रँड अॅम्बेसेडर, राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि TIME च्या प्रभावशाली व्यक्तिमत्वांच्या यादीत समावेश अशी आयुष्मान खुरानाची ओळख आहे. हीच ओळख HP च्या ब्रँड व्हिजनसाठी योग्य मानली गेली आहे, असं कंपनीचं मत आहे.
HP च्या नवीन जाहिरात मोहीमेमध्ये आयुष्मान आणि अपारशक्ती दोघे भाऊ एकत्र दिसणार असून, ही मोहीम भारतीय ग्राहकांमध्ये HP च्या ब्रँडबाबत एक नवीन उत्साह तयार करणार आहे. या मोहिमेत आयुष्मानचा भाऊ, अभिनेता अपारशक्ती खुराणा देखील आहे. HP चे ध्येय प्रामाणिकपणा, टीमवर्क, अनुकूलता आणि नेतृत्व यासारख्या मूलभूत मूल्यांशी सुसंगत आहे. ब्रँडच्या मते आयुष्मान प्रभावी चित्रपटाची निवडी आणि अर्थपूर्ण कंटेंटला समर्थन देतो, यामुळेच तो आगामी मोहिमेचा चेहरा म्हणून योग्य ठरणार आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरील अनेक कामगिरीनंतर आयुष्मान आता HP इंडियासोबत काम करणार आहे. आयुष्मानला अंधाधुनसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आाल आहे. याव्यतिरिक्त, तो युनिसेफ इंडियाचा राष्ट्रीय राजदूत देखील आहे आणि क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरसोबत हा किताब सामायिक करतो. उल्लेखनीय म्हणजे, टाईम मासिकाच्या जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत अवघ्या तीन वर्षांत दोनदा स्थान मिळवणारा आयुष्मान एकमेव भारतीय अभिनेता आहे. या वर्षी आणखी एका सन्मानात, आयुष्मानला अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (ऑस्कर) मध्ये वोटिंग सदस्य म्हणून सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.