विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आदेश, शाळेत स्मार्टफोन घेऊन जाण्यास दिली परवानगी
अनेक देशांनी विद्यार्थ्यांना शाळेत स्मार्टफोन घेऊन जाण्यास मनाई केली आहे. या देशांमध्ये अमेरिका आणि फ्रान्ससह अनेकांचा समावेश आहे. भारतात देखील शाळांमध्ये स्मार्टफोन वापरण्यास मनाई होती. मात्र आता भारतातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना शाळांमध्ये स्मार्टफोन वापरण्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे खरं तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उच्च न्यायालयाने शाळांमध्ये स्मार्टफोन वापरण्यास परवनागी दिली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, शाळांमध्ये स्मार्टफोनच्या वापरावर बंदी घालता येणार नाही. शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून स्मार्टफोनच्या वापरावर न्यायालयाने म्हटले आहे की, हे डिव्हाईस विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समन्वय राखण्यासह अनेक कारणांसाठी उपयुक्त आहे, ज्यामुळे मुलांची सुरक्षितता सुनिश्चित होते. जगातील इतर अनेक देशांमधील शाळांमध्ये मोबाईल फोनवर बंदी आहे. अशा परिस्थितीत भारत एका नवीन मार्गावर वाटचाल करत असल्याचे दिसतं आहे. आता भारतातील शाळांमध्ये विद्यार्थी मोबाईल वापरू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
न्यायालयाने म्हटले आहे की, धोरणात्मक बाब म्हणून, विद्यार्थ्यांना शाळांमध्ये स्मार्टफोन घेऊन जाण्यापासून रोखता येत नाही, परंतु त्यांच्या वापरावर लक्ष ठेवले जाऊ शकते. विद्यार्थी त्यांचा फोन शाळेत सुरक्षित ठिकाणी ठेवू शकतात आणि घरी जाताना तो घेऊन जाऊ शकतात. वर्गात शिस्त राखण्यासाठी, वर्गात फोन वापरण्यावर आणि स्मार्टफोन कॅमेऱ्यांचा वापर आणि सामान्य ठिकाणी आणि शालेय वाहनांमध्ये रेकॉर्डिंग करण्यावर बंदी घालण्यात यावी, असं देखील न्यायालयाने म्हटलं आहे. जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.
न्यायालयाने आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना जबाबदार ऑनलाइन वर्तन, डिजिटल शिष्टाचार आणि फोनच्या नैतिक वापराबद्दल जागरूक करावे. याशिवाय, विद्यार्थ्यांना जास्त स्क्रीन टाइम, सायबर बुलींग आणि चिंता इत्यादी टाळण्यासाठी समुपदेशन दिले पाहिजे. जेणेकरून विद्यार्थी स्मार्टफोनचा गैरवापर करू शकणार नाहीत. तसेच विद्यार्थांचे अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना स्मार्टफोनच्या फायद्यासोबतच नुकसानबाबत देखील जागरूक करणं गरजेचं आहे.
अमेरिका आणि फ्रान्ससह जगातील अनेक देशांमध्ये विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन वापरण्यास बंदी आहे. स्वीडनमध्ये, 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना स्क्रीन वापरण्याची परवानगी नाही. किशोरावस्थेतही विद्यार्थी मर्यादित काळासाठी स्क्रीन वापरू शकतात. त्याचप्रमाणे, अमेरिका शाळांमध्ये फोनच्या वापरावर नियम बनवण्याचा विचार करत आहे. इटलीमध्ये, माध्यमिक शाळेपर्यंतचे विद्यार्थी फोन वापरू शकत नाहीत. मात्र आता भारताने या सर्व नियमांना वगळून एक नवीन दिशेने वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आता विद्यार्थ्यांना शाळांमध्ये स्मार्टफोन वारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.