बेरोजगार तरूण आणि गृहिणींना टार्गेट करतोय Pig butchering स्कॅम! तुमच्या सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा या टीप्स
Pig butchering Scam: सरकारने सर्व जनतेसाठी एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट Pig butchering स्कॅमबाबत आहे. बेरोजगार तरुण, विद्यार्थी आणि गृहिणींना लक्ष्य करणारा Pig butchering स्कॅम नक्की आहे काय आणि कशा प्रकारे काम करतो, याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ आहे.
Pig butchering स्कॅममध्ये केवळ पैशांची फसवणूक होत नाही तर लोकांना सायबर गुलामगिरीतही अडकवले जाते. Pig butchering स्कॅमला sha zhu pan स्कॅम देखील म्हटलं जातं. ही एक ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक आहे. यामध्ये, फसवणूक करणारे बनावट ऑनलाइन ओळखपत्र तयार करून लोकांना फसवतात आणि त्यांना बनावट गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करतात. याला Pig butchering म्हणतात कारण फसवणूक करणारे प्रथम पीडितेचा विश्वास जिंकतात आणि त्याला गुंतवणुकीसाठी तयार करतात आणि नंतर अचानक सर्व पैसे लुटतात. हा घोटाळा सहसा परदेशातून चालतो आणि लोकांना क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक करण्यासाठी लालच देतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
बनावट ओळख निर्माण करणे – स्कॅमर्स यशस्वी गुंतवणूकदार किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिच्या नावाने बनावट ऑनलाइन प्रोफाइल तयार करतात आणि चोरी केलेले किंवा एआय-जनरेटेड फोटो आणि खोट्या बातम्यांचा वापर करतात.
संपर्क – ते डेटिंग अॅप्स, सोशल मीडिया किंवा रँडम कॉल्स आणि मेसेजेसद्वारे लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करतात आणि पहिल्यापासून तयार असणाऱ्या स्क्रिप्ट्स वापरतात.
विश्वास जिंकणे – स्कॅमर्स आठवडे किंवा अनेक महिने एखाद्या व्यक्तिसोबत बोलतात, भेटवस्तू पाठवतात आणि भावनिक जवळीक निर्माण करतात. सुरुवातीला स्कॅमर्स गुंतवणुकीबद्दल बोलत नाहीत.
फसवणूक – स्कॅमर्स अनुभवी गुंतवणूकदार असल्याचे भासवतात आणि तुम्हाला क्रिप्टोकरन्सी किंवा फॉरेक्समध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करतात आणि खोट्या कथा सांगतात.
रक्कम जमा करणं – पीडित व्यक्तीला बनावट गुंतवणूक अॅप/वेबसाइटवर खाते तयार करण्यास सांगितले जाते आणि सुरुवातीला थोडी रक्कम जमा करण्यास सांगितले जाते.
पैसे गुंतवण्यासाठी दबाव निर्माण करणं – स्कॅमर्स बनावट नफा अहवाल, विशेष ऑफर दाखवून तुम्हाला अधिक गुंतवणूक करण्यास भाग पाडतात आणि तुमच्यावर लवकर गुंतवणूक करण्यासाठी दबाव आणतात.
अचानक गायब होणे – एकदा फसवणूक करणारे जास्तीत जास्त पैसे लुटल्यानंतर, पिडीत व्यक्तिसोबत संपर्क तोडतात, वेबसाइट डिलीट करतात आणि कधीकधी पीडिताच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर देखील करतात.
हा स्कॅम 2016 मध्ये चीनमधून सुरू झाला होता, ज्यामध्ये सायबर गुन्हेगार प्रथम लोकांचा विश्वास जिंकतात. ते हळूहळू त्यांना क्रिप्टोकरन्सी किंवा इतर कोणत्याही गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवण्यासाठी तयार करतात. जेव्हा पीडित व्यक्ती मोठी रक्कम गुंतवतात तेव्हा गुन्हेगार अचानक संपूर्ण रक्कम घेऊन गायब होतात, ज्यामुळे लोकांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
गृह मंत्रालयाच्या I4C (इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर) ने गुगलसोबत भागीदारी केली आहे आणि या फसवणुकीशी संबंधित माहिती शेअर केली आहे. याव्यतिरिक्त, फेसबुकवर चालणाऱ्या फसवणुकीच्या जाहिरातींवरही लक्ष ठेवले जात आहे. सरकार सायबर गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत आहे जेणेकरून अशा प्रकारची फसवणूक थांबवता येईल.