Google Chrome यूजर्स सावधान! सरकारने दिली वॉर्निंग, धोक्यात आहे तुमचा पर्सनल डेटा; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
तुम्ही देखील तुमच्या छोट्या छोट्या कामांसाठी गुगल क्रोमचा वापर करत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यूआरएल तपासण्यासाठी असो किंवा एखाद्या विषयाची माहिती शोधण्यासाठी असो आपण दिवसातून असंख्य वेळा गुगल क्रोमचा वापर करतो. गुगल क्रोम आपल्या रोजच्या जिवनात अत्यंत महत्त्वाचा आहे. पण आता याच महत्त्वाच्या असलेल्या गुगल क्रोम युजर्ससाठी सरकारने एक वॉर्निंग जारी केली आहे. गुगल क्रोम युजर्सचा डेटा धोक्यात असल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे.
इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने गुगल क्रोम डेस्कटॉप युजर्सना ब्राउझरमध्ये आढळलेल्या अनेक गंभीर त्रुटींबद्दल इशारा दिला आहे. सुरक्षा एजन्सीने या त्रुटींना उच्च जोखीम इशारा म्हणून चिन्हांकित केले आहे आणि हॅकर्स त्याचा फायदा घेऊन तुमच्या सिस्टमवर नियंत्रण मिळवू शकतात किंवा तुमचा संवेदनशील डेटा चोरू शकतात, असा दावा देखील करण्यात आला आहे. त्यामुळे एकदा हॅकर्सनी तुमच्या सिस्टमवर नियंत्रण मिळवलं की, तुमचा डेटा धोक्यात येईल. शिवाय तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकतं. त्यामुळे गुगल क्रोमचा वापर करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सायबर सुरक्षा एजन्सीच्या मते, जर तुम्ही क्रोम वापरत असाल तर सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही तुमचा ब्राउझर तात्काळ नवीनतम आवृत्तीवर अपडेट करावा. त्यामुळे संभाव्य धोके टाळता येऊ शकतील. जर तुमचा वेब ब्राऊझर अपडेट नसेल, तर हे हॅकर्सना आमंत्रण दिल्यासारखं आहे. त्यामुळे तात्काळ तुमचा वेब ब्राऊझर अपडेट करा.
सायबर सुरक्षा टिमचे म्हणणे आहे की कस्टम टॅब, इंटेंट्स, एक्सटेंशन, नेव्हिगेशन, ऑटोफिल आणि डाउनलोड्सच्या खराब अंमलबजावणीमुळे गुगल क्रोममध्ये अनेक त्रुटी आहेत. याचा फायदा घेत, हॅकर तुम्हाला अशा वेब पेजवर पाठवू शकतो जिथून तुमच्या सिस्टममध्ये काही कोड इन्स्टॉल केले जाऊ शकतात, त्यानंतर तुमच्या डिव्हाइसचे संपूर्ण नियंत्रण हॅकरकडे जाऊ शकते.
CERT-In ने जारी केलेल्या अलर्टमध्ये असे म्हटले आहे की ही समस्या Linux वर 135.0.7049.52 आणि Windows आणि macOS वर 135.0.7049.41/42 पेक्षा आधीच्या Chrome आवृत्त्यांमध्ये दिसून येत आहे. म्हणजे जर तुमच्या डिव्हाइसवर गुगल क्रोमची ही आवृत्ती इन्स्टॉल केलेली असेल तर ती ताबडतोब अपडेट करा अन्यथा तुमचा वैयक्तिक डेटा धोक्यात येऊ शकतो.
सरकारने जारी केलेला हा इशारा त्या सर्व युजर्ससाठी आहे जे घरी किंवा ऑफिसमध्ये संगणकावर गुगल क्रोम वापरत आहेत. या सुरक्षिततेच्या समस्येमुळे, हॅकर्स तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतात किंवा तुमचा संगणक अस्थिर किंवा क्रॅश देखील करू शकतात. म्हणून तुमचे डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यासाठी, Chrome ला तात्काळ नवीनतम आवृत्तीवर अपडेट करा.