
प्रवाशांच्या अडचणी वाढणार! विमान प्रवासात बॅन होऊ शकतं हे महत्त्वाचं गॅझेट, सरकार लवकरच जारी करू शकते नवीन नियम
तुम्ही देखील विमानाने प्रवास करता का? तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता भारतीय सरकार लवकरच काही गॅजेट्सवर बंदी आणणार आहे. त्यामुळे असे गॅजेट्स विमानात घेऊन जाण्यास बंदी असणार आहे. हे गॅजेट्स कोणते आहे आणि या गॅजेटवर बंदी घालण्याचा निर्णय का घेतला जाऊ शकतो, याबद्दल सर्वात आधी जाणून घेऊया.
भारत सरकार लवकरच विमान प्रवासादरम्यान फ्लाईटमध्ये पावर बँक घेऊन जाण्यास आणि त्याचा वापर करण्यास बंदी घालणार आहे. नागरिक उड्डयन महानिदेशालय संबंधित लवकरच एक नवा नियम जारी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना पावर बँक विमानात घेऊन जाता येणार नाही. अलीकडे इंडिगोच्या एका फ्लाईटमध्ये पावक बँकमुळे एक अशी घटना घडली होती, ज्यामुळे विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे या घटनेचा विचार करता, आता सरकार लवकरच विमानात पावर बँकचा वापर करण्यास बंदी घालण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
19 ऑक्टोबर रोजी दिल्ली ते दिमापुर या फ्लाईटमधील एका प्रवाशाकडे असलेल्या पावर बँकला अचानक आग लागली. त्यामुळे इथे असलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. अचानक आग लागल्यामुळे सर्व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता याच घटनेचा गांभीर्याने विचार करून सरकार लवकरच याबाबत ॲक्शन घेण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, या संपूर्ण प्रकरणाच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या गांभीर्याने विचार केला जात असून आता लवकरच विमानात पावर बँकचा वापर करण्यावर बंदी घातली जाणार आहे. DGCA याबाबत लवकरच नियम जारी करणार आहे.
सध्या क्वांटिटी लिमिट, फ्लाइटदरम्यान चार्जिंगवर प्रतिबंध, स्टोरेजसाठी नियम आणि विजिबल कॅपॅसिटी रेटिंग यांसारख्या विषयांवर चर्चा केली जात आहे. इतर देशांप्रमाणेच भारतातही विमानात शुल्क आकारणीवर बंदी घातली जाऊ शकते अशी अटकळ आहे. नवीन नियम लागू करण्यापूर्वी प्रवाशांचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवरील अवलंबित्व यावरही विचार केला जात आहे. कारण सध्याच्या गॅझेट आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट बनली आहे. गॅझेट नसेल तर आपलं कोणतंही काम पूर्ण होत नाही. म्हणजेच अगदी स्मार्टफोनपासून स्मार्टवॉचपर्यंत आपली बरीच कामं गॅझेट्सवर अवलंबून असतात. त्यामुळे नेमक्या कोणत्या गॅझेट्सवर बंदी घालावी, याबाबत आता विचार केला जात आहे.
इंडिगो फ्लाइटच्या काही दिवसांपूर्वीच एयर चाइनाची एक फ्लाइट डायवर्ट करण्यात आली होती. याचं कारण देखील पावर बँकमुळे आग लागणे असंच होतं. अशा घटना वारंवार घटत असल्याने सरकार आता या घटनांचा गांभीर्याने विचार करत आहे. अनेक विमान कंपन्यांनी पॉवर बँकांबाबतचे त्यांचे नियम बदलले आहेत. एमिरेट्स एअरलाइनने फ्लाइट दरम्यान पॉवर बँक वापरण्यास बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे सिंगापूर एअरलाइन्सने केबिनमधील यूएसबी पोर्टद्वारे चार्जिंग बंद केले आहे.