
Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित
मिळालेल्या माहितीनुसार, यामागे एक अतिशय रंजक तंत्रज्ञान वापरले जाते. याला कॅपॅसिटिव्ह टचस्क्रीन असं म्हटलं जातं. खरं तर आपण जेव्हा स्मार्टफोनची स्क्रीन बाहेरील बाजूने पाहतो, तेव्हा एक पृष्ठभाग दिसतो. मात्र यात अनेक थर असतात. यामध्ये डिस्प्ले पॅनलसह एक टच-सेंसिंग लेयर देखील उपलब्ध असतो. हा थर अत्यंत छोटे इलेक्ट्रिकल सिग्नल आणि आतमध्ये होणारे पार्ट्सचे बदल जाणवू शकतो. जेव्हा तुम्ही स्क्रीनला स्पर्श करता तेव्हा तुमची बोटे या सिस्टिममध्ये काही बदल निर्माण करतात आणि फोन हाच बदल स्पर्शाच्या रुपात ओळखतो. (फोटो सौजन्य – AI Created)
अनेक ॲडवांस स्मार्टफोनमध्ये कॅपॅसिटिव्ह टच टेक्नोलॉजीचा वापर केला जातो. स्क्रीनच्या टच लेयरमध्ये अत्यंत पातळ आणि ट्रांसपेरेंट इलेक्ट्रोड ग्रिड असते. या इलेक्ट्रोडच्या आजूबाजूला एक छोटा इलेक्ट्रिकल फील्ड तयार केला जातो. समजा, स्क्रीनवर शेकडो छोटे-छोटे सेंसर पॉइंट आहेत. जोपर्यंत तुम्ही स्क्रीनला स्पर्श करत नाहीत, तेव्हा सिस्टिममध्ये सामान्य विद्युत स्थिती राखली जाते. मात्र जेव्हा तुमची बोटे स्क्रीनजवळ जातात किंवा स्क्रीनला स्पर्श करतात तेव्हा या विद्युत स्थितीत बदल होतो.
मिळालेल्या माहितनुसार, या ठिकाणी मानवी शरीर एक महत्त्वाची भूमिका बजावते. खरं तर, मानवी शरीरात विद्युत शक्ती असते. मानवी शरीर विद्युत प्रभारांवर प्रभाव टाकू शकते. जेव्हा आपली बोट स्क्रीनच्या विद्युत क्षेत्राच्या संपर्कात येते, तेव्हा कॅपेसिटेंस बदलते. टच कंट्रोलर हाच बदल अनुभवतो. यानंतर हा कंट्रोलर स्क्रीनच्या कोणत्या भागात बदल झाला आहे, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ असा आहे की, फोन तुमची बोट कॅमेऱ्याप्रमाणे पाहून ओळखत नाही तर डिव्हाईसमध्ये होणारे इलेक्ट्रिकल बदलांचे मोजमाप करून ठरवतो की स्क्रीनला स्पर्श करण्यात आला आहे.
खरं तर, स्मार्टफोनच्या टचस्क्रीनमध्ये इलेक्ट्रोड एक प्रकारचे नेटवर्क बनवते. जेव्हा बोटे स्क्रीनवरील एखाद्या ठिकाणी स्पर्श करतात तेव्हा त्या भागाच्या आसपास विद्युत संकेतांमध्ये बदल झाल्याचे लक्षात येते. टच कंट्रोलर हे बदल वाचून एक अंदाज लावतो की स्पर्शाची स्थिती काय असू शकते. यानंतर ही माहिती स्मार्टफोनचा प्रोसेसर आणि ऑपरेटिंग सिस्टमपर्यंत पोहोचवली जाते.
उदाहरणार्थ, समजा तुम्ही स्क्रीनच्या तळाशी डाव्या बाजूला असलेल्या एखाद्या ॲपच्या आयकॉनवर टॅप केले. टच सिस्टीम त्या ठिकाणचे X आणि Y निर्देशक ओळखते. ऑपरेटिंग सिस्टीमला समजते की त्या ठिकाणचा ॲप आयकॉन दाबला गेला आहे आणि त्यानंतर ते ॲप उघडते.