या देशातही बॅन झाला DeepSeek AI; अखेर चीनने दिली तीव्र प्रतिक्रिया, व्यापार मुद्द्यांचे राजकारण...
चिनी स्टार्टअप DeepSeek वर बंदी घालणाऱ्या देशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक देशांनी आतापर्यंत DeepSeek वर बंदी घातली आहे. आता या देशांमध्ये आणखी एक नाव सहभागी झालं आहे, ते म्हणजे दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाने चिनी स्टार्टअप DeepSeek वर बंदी घातली आहे. डेटा संकलनावर चिंता व्यक्त करून देशाने हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. दक्षिण कोरियाने घेतलेल्या या निर्णयानंतर आता चीनने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दक्षिण कोरियाने त्यांच्या अॅप स्टोअरमधून चिनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) कंपनी DeepSeek चे अॅप्स तात्पुरते काढून टाकले आहेत. कंपनी युजर्सचा डेटा कसा हाताळते याची सरकार चौकशी करत आहे. डेटा प्रोटेक्शन कमिशन (पीआयपीसी) म्हणते की जोपर्यंत DeepSeek कोरियन गोपनीयता कायद्यांचे पालन करत नाही तोपर्यंत ते डाउनलोडसाठी उपलब्ध राहणार नाही. दक्षिण कोरिया स्थानिक कायद्यांचे पालन करून चॅटबॉट डेटा गोळा करत आहे याची खात्री होईपर्यंत दक्षिण कोरियात DeepSeek वरील बंदी उठवली जाणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
दक्षिण कोरियातील लोकांना DeepSeek त्यांच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करण्यास बंदी घालण्यात आली आहे. DeepSeek गुगल आणि अॅपल अॅप स्टोअर्समधून देखील हटवण्यात आलं आहे. त्यामुळे दक्षिण कोरियात DeepSeek अॅप डाऊनलोड केला जाऊ शकत नाही. मात्र असं असलं तरी देखील या AI चा वापर वेब ब्राउझरद्वारे केला जाऊ शकतो. दक्षिण कोरियाच्या वैयक्तिक माहिती संरक्षण आयोगाने DeepSeek च्या डेटा संकलनाबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हटले की हे प्रकरण सोडवण्यासाठी वेळ लागू शकतो. दुसरीकडे, DeepSeek ने स्थानिक सरकारसोबत काम करण्यासाठी त्यांच्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.
दक्षिण कोरियामध्ये DeepSeek वर बंदी घातल्यानंतर चीनने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. चीनने म्हटले आहे की दक्षिण कोरियाने व्यापार मुद्द्यांचे राजकारण करू नये. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने DeepSeek चा बचाव करताना म्हटले की, चिनी कंपन्या परदेशात स्थानिक नियमांनुसार काम करतात. त्यामुळे आता चीनने दिलेल्या या उत्तरावर दक्षिण कोरिया काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर देशही DeepSeek बाबत सतर्क झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने सरकारी डिव्हाईसवर त्याचा वापर करण्यास बंदी घातली आहे. इटलीच्या डेटा प्रोटेक्शन ऑथॉरिटीने त्यांच्या देशातील चॅटबॉट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तैवानने सरकारी विभागांमध्येही त्याचा वापर करण्यास बंदी घातली आहे. फ्रान्स आणि इटलीनेही DeepSeek वर काही निर्बंध लादले आहेत.
Earthquake Warning: हे 3 स्मार्टफोन अॅप्स देतात भूकंपाची वॉर्निंग, आत्ताच इंस्टॉल करा
खरं तर, अनेक अहवालांमध्ये असे उघड झाले आहे की डीपसीक वापरकर्त्यांचा जास्त डेटा गोळा करते आणि तो चीनी सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या कंपन्यांच्या सर्व्हरवर साठवते. चीनी स्टार्टअप कंपनी 2023 मध्ये चीनमधील हांगझोऊ शहरात स्थापन झाली आणि तिने ओपन-सोर्स AI मॉडेल DeepSeek R1 लाँच केले, जे ओपनएआयच्या चॅटजीपीटीशी स्पर्धा करते.