WhatsApp युजर्ससाठी धोक्याची घंटा! 24 देशांमध्ये Spyware अटॅकचा खुलासा, इटालियन सरकारने सुरु केली चौकशी
काही दिवसांपूर्वीच मेटाने व्हॉट्सॲप युजर्ससाठी एक इशारा जारी करत व्हॉट्सॲप युजर्स हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याचं सांगितलं होतं. आता सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, कमीत कमी 24 देशांमधील वापरकर्त्यांना प्रगत स्पायवेअर हल्ल्याचा धोका आहे, ज्यामध्ये एकट्या इटलीमध्ये सात प्रकरणांची पुष्टी झाली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हल्ल्याचा शिकार होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची गरज नाही. हा झिरो-क्लिक अटॅक आहे.
झिरो-क्लिक अटॅकचा वापर करून हॅकर्स अगदी सहजपणे युजर्सचे व्हॉट्सॲप हॅक करू शकतात. यासाठी युजर्सना कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची गरज नाही. हॅकर्स वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय किंवा कोणत्याही कृतीशिवाय त्यांच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश करू शकतात. रिपोर्ट्सनुसार, हे स्पायवेअर फर्म पॅरागॉन सोल्युशन्सशी जोडलेले आहे. पत्रकार, कार्यकर्ते आणि नागरी समाजातील सदस्यांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करण्यासाठी या स्पायवेअरचा वापर करण्यात आला आहे. हा हल्ला अत्यंत धोकादायक मानला जातो, कारण तो पारंपारिक सुरक्षा उपायांना पूर्णपणे बायपास करू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
मेटाने यापूर्वी देखील त्यांच्या युजर्सना सुरक्षित राहण्याचा इशारा देत व्हॉट्सॲप हल्ल्याबाबत माहिती दिली होती. आता मेटाने या हॅकिंग हल्ल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने स्पायवेअर क्रियाकलापांचा मागोवा घेतला आणि ताबडतोब इटलीच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सीला सतर्क केले.
झिरो क्लिक अटॅकमुळे प्रभावित झालेल्या काही लोकांची नावं समोर आली आहेत.
लुका कॅसारिनी – माइग्रेंट रेस्क्यू एक्टिविस्ट आणि Mediterranea Saving Humans चे को-फाउंडर. लुका कॅसारिनी यांनी व्हॉट्सॲपकडून मिळालेला एक इशारा देखील शेअर केला, ज्यामध्ये त्यांना कळवले होते की त्यांचे डिव्हाइस हॅक झाले आहे.
फ्रान्सिस्को कॅन्सेलाटो – एक प्रसिद्ध इन्वेस्टिगेटिव जर्नलिस्ट
इटलीचे पंतप्रधान जिओर्डानो मेलोनी यांच्या कार्यालयाने या सायबर हल्ल्याचा निषेध केला आणि राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सी या घटनेची सखोल चौकशी करत असल्याचे आश्वासन दिले. तथापि, सरकारने या हल्ल्यात कोणताही सहभाग नाकारला आहे आणि गोपनीयतेच्या कारणास्तव पीडितांची संपूर्ण यादी शेअर करण्यास नकार दिला आहे.
तयार आहात ना! या आठवड्यात ओपन होणार Apple चा मॅजिक बॉक्स, iPhone SE 4 सह लाँच होणार हे गॅझेट्स
झिरो-क्लिक हॅकिंग वेगाने एक मोठा धोका बनत आहे. म्हणून, व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचा आणि त्यांचे डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सुरक्षा उपाय करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.