UIDAIने आणले नवे मोबाईल अॅप; आधार कार्डशीसंबंधित समस्या होणार दूर
UIDAI New Aadhaar App: केंद्र सरकारच्या आधार सेवांशी संबंधित कामे आता आणखी सोपी होणार आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ‘UIDAI’या आधार कार्ड जारी करणाऱ्या संस्थेने एक नवीन मोबाइल अॅप विकसित केले आहे. हे अॅप लवकरच लोकांसाठी लाँच केले जाणार आहे. UIDAI चे सीईओ भुवनेश्वर कुमार यांनी स्वतः एका मुलाखतीत या नवीन आधार अॅपबद्दल माहिती दिली आहे.
भुवनेश्वर कुमार यांनी अॅपबद्दल अनेक प्रमुख तपशील शेअर केले आहेत. यात या अॅपची नवीन वैशिष्ट्ये, त्याची लाँच करण्याची तारीख आणि तुमचा मोबाइल नंबर अपडेट करण्याची योग्य पद्धत या प्रक्रियांचा समावेश आहे. ही बातमी विशेषत: आधारशी संबंधित सेवा केंद्रांना वारंवार भेट देणाऱ्या किंवा कागदपत्रांच्या फोटोकॉपी घेऊन फिरणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल, अशी माहिती कुमार यांनी दिली.
भुवनेश्वर कुमार म्हणाले की, UIDAIचे नवीन अॅप पूर्णपणे तयार झाले असून पुढील २-३ महिन्यांत लाँच केले जाईल. अॅपची चाचणी आणि डेमो प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना जास्त वेळ वाट पहावी लागणार नाही. हे अॅप सध्याच्या mAadhaar अॅपपेक्षा अधिक प्रगत आणि वापरकर्ता-अनुकूल असेल. हे नवीन अॅप डिजिटल सेवा सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने UIDAI चे आणखी एक पाऊल आहे. डिजिटल ओळख शेअरिंग, QR कोड पडताळणी आणि सुधारित इंटरफेस यासारख्या नवीन वैशिष्ट्यांमुळे लोकांची दैनंदिन कामे सोपी होतील. नोकरीची मुलाखत असो किंवा बँक खाते उघडणे असो, ओळख सिद्ध करण्यासाठी आता फोटोकॉपीची आवश्यकता राहणार नाही. अॅपद्वारे फक्त काही क्लिकवर सर्व माहिती पाठवता येते आणि सर्व काही तुमच्या परवानगीने केले जाते.
नवी मुंबई International Airport वरून व्यावसायिक उड्डाणे होणार; Air India ने जाहीर केली ‘ही’ योजना
आतापर्यंत, एखाद्याची ओळख पटवताना, आधार कार्डची फोटोकॉपी आवश्यक होती. हे नवीन अॅप आता फक्त आधार कार्ड धारकाच्या परवानगीने ओळख माहिती डिजिटल पद्धतीने शेअर करण्यास परवानगी देईल. जर वापरकर्त्याची इच्छा असेल तर ते कोणती माहिती शेअर करायची हे ठरवू शकतात. यामुळे डेटा सुरक्षितता राखला जाईल आणि कागदपत्रांचा त्रासदेखील दूर होईल. UIDAI बनावट आधार कार्डची समस्या दूर करण्यासाठी देखील काम करणार आहे. आता तुम्ही नवीन आधार अॅपसह कोणत्याही आधार कार्डचा QR कोड स्कॅन करून त्याची वैधता तपासू शकता. प्रत्येक आधार कार्डमध्ये QR कोड असतो. UIDAI अॅपने हा कोड स्कॅन केल्याने तुम्हाला आधार कार्ड खरे आहे की खोटे हे काही मिनिटातचं कळू शकेल.